मद्यपीकडून अल्पवयीन मुलाचे अपहरण; रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये घटना चित्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 02:14 AM2017-09-10T02:14:52+5:302017-09-10T02:15:06+5:30
आईवडिलांसोबत वडापाव खाण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलाच्या अपहरणाची घटना वाशी येथे घडली आहे. वाशी रेल्वेस्थानकालगत झोपडीमध्ये राहणाºया कुटुंबासोबत हा प्रकार घडला आहे.
नवी मुंबई : आईवडिलांसोबत वडापाव खाण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलाच्या अपहरणाची घटना वाशी येथे घडली आहे. वाशी रेल्वेस्थानकालगत झोपडीमध्ये राहणाºया कुटुंबासोबत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही तपासले असता, एक मद्यपी त्या मुलाला घेऊन जाताना दिसत आहे. मात्र, त्याच्याविषयीची अधिक माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही.
रघू नाना शिंदे (०३), असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. तो वाशी रेल्वेस्थानकालगतच्या मोकळ्या भूखंडावरील झोपडीत राहणारा असून आईवडील बिगारी कामगार आहेत. बुधवारी दुपारी आईवडिलांसोबत रेल्वे -स्थानकाबाहेरील वडापावच्या दुकानावर तो आला होता. या वेळी आईवडील वडापाव घेत असताना, त्याचा हात मोकळा सोडलेला होता; परंतु काही वेळातच तो त्या ठिकाणावरून दिसेनासा झाला. यामुळे आईवडिलांनी त्याचा परिसरात शोध घेतला असता तो सापडला नाही. याप्रकरणी त्यांनी वाशी पोलिसांकडे तक्रार केली असता, रघूच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीच्या शोधाकरिता पोलिसांनी रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही तपासले असता, एक मद्यपी व्यक्ती त्याला घेऊन जाताना दिसून आली. फलाट क्रमांक-तीन वरून ही व्यक्ती रघूला घेऊन पनवेलच्या दिशेने जाणाºया रेल्वेतून निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. मात्र, सानपाडा ते पनवेल दरम्यानच्या स्थानकातील सीसीटीव्ही तपासले असता, त्यात कोणीच पोलिसांना दिसून आलेले नाही. यामुळे मुलाचे अपहरण केलेली व्यक्ती नेमकी गेली कुठे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. दरम्यान, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.