आंब्याच्या २९ हजारासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण; नेरुळ मधील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: April 22, 2024 06:51 PM2024-04-22T18:51:22+5:302024-04-22T18:51:34+5:30
ज्ञातामार्फत आंब्याची ऑर्डर देऊन रचला कट
नवी मुंबई : आंब्याच्या खरेदीचे २९ हजार रुपये वसुलीसाठी व्यक्तीच्या १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. बनावट ग्राहक तयार करून वडाळा येथून नेरूळमध्ये आंबे मागवण्यात आले होते. हे आंबे घेऊन व्यापाऱ्याचा अल्पवयीन मुलगा नेरूळमध्ये आला असता त्याचे अपहरण करून गाळ्यावर नेवून मारहाण करण्यात आली.
वडाळा येथील किरकोळ आंबे विक्रेते प्रेमकुमार यादव (४२) यांच्यासोबत १० एप्रिलला हि घटना घडली आहे. मात्र या घटनेनंतर भयभीत झालेल्या यादव यांनी शनिवारी रात्री याप्रकरणी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार अमर उकिर्डे, वसीकुल इस्लाम व इतर एकजण अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यादव यांनी एपीएमसी मधील व्यापारी वसीकुल याच्याकडून गतवर्षी आंबे खरेदी केले होते. त्याचे २९ हजार रुपये त्यांनी दिले नव्हते. या पैशासाठी वसीकुल याच्याकडून तगादा सुरु होता. त्यानंतरही यादव आंब्याच्या बिलाचे थकीत पैसे देत नसल्याने त्याने अपहरणाचा कट रचला होता. यासाठी अमरच्या माध्यमातून यादव यांना फोन करून १० डझन आंब्याची ऑर्डर देण्यात आली होती. हे आंबे घेऊन यादव यांचा सहकारी व मुलगा अलोक (१५) नेरूळमध्ये आला होता. स्थानकाच्या बाहेर दोघेही येताच त्याठिकाणी थांबलेल्या वसीकुल याने अलोकला जबरदस्ती दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अलोकने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता वसीकुलचा एक सहकारी दुचाकीवर मागे बसून दोघांनी त्याला एपीएमसी मध्ये आणले. त्याठिकाणी त्याला मारहाण करत वडील प्रेमकुमार यादव यांना फोन करून थकबाकीच्या २९ हजाराची मागणी करण्यात आली. त्यानंतर पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री त्याला सोडण्यात आले. या घटनेनंतर भयभीत झालेल्या यादव यांनी शनिवारी रात्री नेरुळ पोलिसांकडे या घटनेबाबत तक्रार केली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.