नवी मुंबई : ट्रेडिंग मध्ये लावलेल्या पैशाचा अपेक्षित असा मोबदला न मिळाल्याने ब्रोकरचे अपहरण करून मारहाण करत त्याच्या खात्यातून पैसे काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सात जणांवर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऐरोली येथे राहणाऱ्या प्रतीक जाधव (२८) याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. तो ऑनलाईन ट्रेडिंग करत असून इतरांनाही गुंतवणुकीच्या माध्यमातून नफा मिळवून देण्याचे काम करतो. मागील काही महिन्यांपूर्वी त्याने ऐरोली परिसरात राहणाऱ्या काहींना गुंतवणुकीच्या अधिक पटीने नफा मिळवून दिला होता. त्यानुसार श्रद्धा कदम, सागर कड यांनी व त्याच्या काही मित्रांनी देखील त्याच्यामार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते. मात्र त्यामधून अपेक्षित असा नफा झाला नव्हता. यामुळे त्यांच्याकडून प्रतीक याच्याकडे अधिक पैशाची मागणी केली जात होती.
परंतु मार्केट मध्ये आपलेही नुकसान झाले असल्याचे तो सतत सांगत होता. यानंतरही त्यांनी ६ मार्चला सर्वांनी त्याला भेटीसाठी बोलावून कारमध्ये कोंबून अपहरण केले. त्याला ऐरोलीत एका ठिकाणी नेवून तिथे मारहाण करून पुन्हा तळोजा येथे एकाच्या घरामध्ये नेले होते. त्याठिकाणी देखील त्याला मारहाण करत त्याच्या मोबाईल मधील बँकेच्या ऍप्लिकेशन मधून पैसे काढून घेतले होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला इमारतीखाली आणून सोडले होते. या घटनेनंतर भयभीत झालेला प्रतीक गावाकडे गेला होता. मात्र नुकताच तो परत आल्यानंतर पुन्हा त्याला पैशासाठी धमकावू लागल्याने त्याने रबाळे पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार सागर कड, ओंकार प्रभू, श्रद्धा कदम, अजय पासाळकर व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.