मुलाचा आवाज ‘एआय’ क्लोन करून फसवणूक; बलात्काराच्या गुन्ह्यात पकडल्याचे सांगत गंडा
By सूर्यकांत वाघमारे | Published: March 8, 2024 01:57 PM2024-03-08T13:57:22+5:302024-03-08T13:57:59+5:30
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुलाला पकडले असून, अटक टाळण्याच्या बहाण्याने हे पैसे उकळले आहेत.
नवी मुंबई : जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचे कौतुक होत असतानाच त्याद्वारे फसवणुकीच्या घटनाही घडू लागल्या आहेत. ‘एआय’चा वापर करून वडिलांना मुलाचा आवाज ऐकवून एक लाख रुपये उकळल्याची घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुलाला पकडले असून, अटक टाळण्याच्या बहाण्याने हे पैसे उकळले आहेत.
सीवूड परिसरात राहणाऱ्या शिक्षकासोबत हा प्रकार घडला आहे. ते मंगळवारी सायन येथील कॉलेजमध्ये असताना त्यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल आला. फोनवरील व्यक्तीने आपण ‘सीबीआय’मधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यात पकडले असून, कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केली. या शिक्षकाला विचार करण्याचीही संधीही न देता फोन सुरू असतानाच निर्णय घेण्यास भाग पाडले. त्यासाठी फोनवरून लेकाचे बोलणेही करून देण्यात आले. त्यामुळे भयभीत झालेल्या वडिलांनी मुलाची अटक टाळण्यासाठी संबंधितांच्या सांगण्याप्रमाणे विविध खात्यांवर एक लाख रुपये पाठवले. यानंतर मात्र त्यांचे मुलासोबत बोलणे झाले असता, मुलगा तर घरीच असल्याचे समोर आले. यामुळे त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत मुलाला सांगितले असता फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
मोबाइल ॲपद्वारे चोरला आवाज?
संबंधित मुलाचा आवाज वडिलांना ऐकविण्यासाठी अगोदर बाप-लेकाचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड केले गेले का, असाही प्रश्न निर्माण होत आहे. अथवा नागरिकांचे आवाज चोरण्यासाठी मोबाइलमधील ॲप्लिकेशनचा वापर होतोय का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
...यापूर्वीही गैरवापर
केरळमध्ये नुकतेच देशातील पहिल्या ‘एआय’ शिक्षिकेला प्रत्यक्षात आणले आहे. दुसरीकडे मात्र फसवणुकीच्या अशा घटना समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘एआय’द्वारे काही अभिनेत्रींचे चेहरे इतर महिलांना वापरून त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनेदेखील ‘एआय’च्या धोक्याची घंटा वाजवली होती.
सांकेतिक संवाद गरजेचा
अडचणीच्या प्रसंगी आपसात संवाद साधताना कुटुंबातील व्यक्तींनी संभाषणात सांकेतिक शब्दांचा उल्लेख ठेवला पाहिजे. त्याद्वारे फोनवरील व्यक्ती खरी आहे की खोटी हे ओळखण्यास मदत होऊ शकते.