नवी मुंबई : भंगार व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातील राग मनात धरून त्याची हत्या झाली होती. दोघांनाही मुंबईमधून अटक करण्यात आली आहे. हासीम गुजराती (४०) या भंगार व्यावसायिकाचा मृतदेह तुर्भे एमआयडीसी परिसरात आढळून आला होता. सहा दिवसांपूर्वी तो पत्नी व मेहुण्यासह एपीएमसी परिसरात भंगार गोळा करण्यासाठी आला होता. तर काम झाल्यानंतर तो एका नातेवाइकाकडे जात असल्याचे सांगून एकटाच निघून गेला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी तुर्भे एमआयडीसी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या हत्येचे कारण व मारेकरूंची माहिती पोलिसांच्या हाती लागली नव्हती. अखेर या गुन्ह्याची उकल करण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून तपास सुरू असताना दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. महम्मद याहीम युनुस सिद्धीकी व महम्मद नसरुद्दीन सिद्धीकी अशी त्यांची नावे आहेत. दोघेही मानखुर्द व कुर्ला परिसरातले राहणारे आहेत. महम्मद याहीम सिद्धीकी याचे मयत हासीम याच्यासोबत पूर्वीचे भांडण होते; परंतु काटा काढण्याच्या उद्देशाने त्याने हासीमसोबत मैत्रीचे नाटक केले. गुन्ह्याची उकल होताच दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
व्यावसायिकाची हत्या करणारे अटकेत
By admin | Published: February 21, 2017 6:32 AM