दिवाळे कोळीवाड्यातील मासळी मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:07 AM2020-09-14T00:07:45+5:302020-09-14T00:08:08+5:30

बेलापूर येथील दिवाळे कोळीवाड्यातील संपूर्ण मासळी मार्केट परिसरात केरकचरा, टाकाऊ ओल्या मासळीचे अवशेष जागीच टाकण्यात येत असल्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे.

The kingdom of dirt in the fish market area of Diwali Koliwada | दिवाळे कोळीवाड्यातील मासळी मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य

दिवाळे कोळीवाड्यातील मासळी मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य

Next

- अनंत पाटील

नवी मुुंबई : सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्याचे टाळून नवी मुंबईतील काही गावठाणात मासळी बाजारात मात्र खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. बेलापूर येथील दिवाळे कोळीवाड्यातील संपूर्ण मासळी मार्केट परिसरात केरकचरा, टाकाऊ ओल्या मासळीचे अवशेष जागीच टाकण्यात येत असल्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे या गावाच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रविवारी सकाळी दिवाळे कोळीवाड्यातील मार्केटमध्ये मासळी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. यावेळी सामाजिक अंतराचा विसरच पडला होता, तसेच सगळीकडे अस्वच्छता होती. मासळी विक्रेत्यांकडून महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना साफसफाईच्या बाबतीत सहकार्य मिळत नसल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात येते.
दिवाळे येथील खाडीच्या किनारी मच्छी विक्रेत्यांसाठी असलेल्या जागेवर ड्रेनेज, पाणी आणि अन्य सुविधा नसल्याने मच्छी विक्रेत्या महिलांना त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. हे मासळी मार्केट उभारत असलेल्या ठिकाणची जागा मेरिटाइम बोर्डाच्या अखत्यारित असल्याने, त्यांची परवानगी लालफितीत अडकून पडल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागत नाही. मच्छीचे दूषित सांडपाणी आणि सडलेल्या माशांचा कचरा जागीच पडलेला असल्याने, परिसरात प्रचंड दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, हवेतील संसर्गजन्य आजारामुळे परिसरात भीती पसरली आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने, दिवाळे गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


कोळीवाड्यातील मार्केट परिसराची अवस्था फार गंभीर आहे. येथील काही रहिवाशांच्या आडमुठ्या धोरणामुळे स्वच्छता राखली जात नाही. केवळ महापालिकेला दोषी न स्वच्छता ठेवणे प्रत्येकाची जबाबदारीही आहे. या गावाच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, पर्यावरणाच्या परवानगी संदर्भात मंजुरी न मिळाल्यामुळे हे काम थांबले आहे. लवकरच पर्यावरण खात्याची मंजुरी मिळणार असल्यामुळे गावच्या विकासपयोगी कामांना गती येईल.
-मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर
आम्ही मच्छी मार्केट परिसरात राहत असल्याने या दुर्गंधीचा खूप जास्त त्रास होतो. अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे कुटुंबाला रोगराईचा सामना करावा लागत आहे.
-विघ्नेश कोळी, ग्रामस्थ
मच्छी मार्केटमध्ये स्वच्छतेची पुरेशी उपाययोजना व कचºयाची विल्लेवाट लावण्यासाठी कोणतीच साधने उपलब्ध नसल्याने परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. -अंकुश कोळी, ग्रामस्थ
घाण पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्याने इथे माश्या, डास मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे घरातील लहान मुलांना साथीच्या रोगांनी वेढले आहे. तरीही पालिका अथवा स्थानिक पुढारी याची दखल घेत नाहीत.-प्रतिभा कोळी, ग्रामस्थ

Web Title: The kingdom of dirt in the fish market area of Diwali Koliwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.