n लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. परंतु काही भागांत या अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. विशेषत: वाशी विभागातील स्वच्छतेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे.वाशी सेक्टर १७ येथील नवरत्न हॉटेलच्या समोर असेलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. दर्शनीभागात असलेल्या या उद्यानात कचऱ्याचे ढीग आहेत. गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांनी आपला अड्डा बनविला आहे. जवळच कचराकुंडी असतानाही परिसरातील व्यावसायिक या उद्यानात कचरा टाकतात. त्यामुळे या उद्यानाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक दिवस कचरा न उचलला गेल्याने त्यातून दुर्गंधी येत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेष म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने हे क्षेत्र नवी मुंबईत प्रसिद्ध आहे. त्यामुळे या भागात विविध शासकीय प्राधिकरणांत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राबता असतो. पालिकेच्या अधिकाऱ्यांची नेहमीच येथे ये-जा असते. तरीही उद्यानाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सेक्टर १७ प्रमाणेच सेक्टर २ मधील मेघदूत, मेघराज आणि अॅबट हॉटलच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नियमित सफाई होत नसल्याने ठिकठिकणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. सफाई कामगार येथील दुकानदारांकडून पैसे घेऊन सफाईची कामे करीत आहेत. या कम्पाउंडमध्ये समाजकंटकांचा वावर वाढला आहे. अनेक महिन्यांपासून येथील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी भिकारी व गर्दुल्ल्यांसाठी हा परिसर आश्रयस्थान बनला आहे.माय नेस्ट शॉप ओनर्स असोसिएशनने यासंदर्भात पालिकेकडे तक्रार केली आहे. तसेच या विभागाचे माजी नगरसेवक अविनाश लाड यांनाही पत्र दिले. पथदिवे बसविण्याबरोबरच नियमितपणे साफसफाईची कामे करण्याची विनंती केली आहे. परंतु सदर प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.या परिसरात अनेक नागरी समस्या आहेत. समाजकंटकांचा वावर वाढला आहे. या टोळक्यांकडून परिसरात अस्वच्छता पसरविली जाते. तसेच पथदिवे बंद असल्याने त्याचा फायदा भिकारी व गर्दुल्ल्यांनी घेतला आहे. त्याचा फटका महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. - सामुल चेरियनमाय नेस्ट शॉप ओनर्स असोसिएशन
वाशीतील उद्यानांत घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:06 PM