नामदेव मोरे / नवी मुंबई मुंबईसह महाराष्ट्रभर फळांचा राजा आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. मुंबई एपीएमसीमध्ये रोज १ लाखपेक्षा जास्त पेट्यांमधून आंबा विक्रीसाठी येत आहे. सरासरी २२ टन मालाची विक्री होत आहे. कोकणासह दक्षिणेतील राज्यांमधून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी येत असून मेअखेरपर्यंत हंगाम सुरू राहणार आहे. देशात सर्वाधिक आंब्याची विक्री मुंबईमध्ये होत असते. मुंबई बाजार समितीमध्ये रोज १ लाखपेक्षा जास्त पेट्यांची आवक होत आहे. विक्रीसाठी येणाऱ्या सर्व फळांमध्ये आंब्याचे प्रमाण ९० टक्के आहे. बाजार समिती पूर्णपणे आंबामय झाली आहे. रोज ३५० ते ४०० ट्रक, टेंपोमधून माल विक्रीसाठी येत आहे. सद्यस्थितीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून ५० हजार पेट्यांची आवक होत आहे. ४ ते ८ डझनची पेटी ६०० ते १४०० रुपये दराने विकली जात आहे. मुंबईमध्ये कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आवक होवू लागली आहे. तेथील हापूस आंबा ३५ ते ६५ रुपये किलो दराने विकला जात असून त्यामुळे कोकणच्या हापूसचे दर गडगडू लागले आहेत. हापूसप्रमाणे गुजरातवरून केसरची आवक होत असून होलसेल मार्केटमध्ये ४० ते ५० रुपये दराने विक्री होत आहे. राजापुरी ३० रुपये किलो, बदामी २० ते ४० रु. किलो, लालबाग १० रु.किलो दराने विकला जात आहे. पुढील काही दिवसामध्ये गुजरातचा हापूस आंबाही विक्रीसाठी येत आहे. कोकणच्या मालाची आवक थोडी कमी झाली असून पुढील १५ दिवसांमध्ये पुन्हा आवक वाढण्याची शक्यता आहे. बाजार समितीमध्ये प्रचंड आवक झाल्याने वाहतूककोंडी होवू नये व अडथळा निर्माण होवू नये यासाठी जादा कर्मचारी तैनात केले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात जादा माथाडी कामगार काम करत आहेत. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आवक मुंबईमध्ये होत आहे.
फळांच्या राजाचे राज्य सुरू
By admin | Published: April 26, 2017 12:27 AM