ग्राहकांच्या सुविधेसाठी किओस्क बुकिंग काउंटर; घरांच्या विक्रीसाठी सिडकोने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 10:12 AM2024-02-29T10:12:55+5:302024-02-29T10:13:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या ३,३२२ घरांच्या योजनेकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या ३,३२२ घरांच्या योजनेकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे ही घरे विकण्यासाठी सिडकोच्या संबंधित विभागाकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्राहकांना सुलभरीत्या घरांची नोंदणी करता यावी, त्यांच्या शंकांचे निरसन करता यावे, या उद्देशाने सिडकोने द्रोणागिरी आणि तळोजा येथे किओस्क बुकिंग काउंटर सुरू केले आहेत.
सिडकोने विविध घटकांसाठी विविध गृहयोजनांच्या माध्यमातून जवळपास तीस हजार घरांची योजना जाहीर करून त्यांची संगणकीय सोडत काढली आहे; मात्र विविध कारणांमुळे हजारो घरे विक्रीविना पडून आहेत. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक घरे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. त्यांपैकी ३३२२ घरांची योजना जाहीर केली आहे.
उपलब्ध सदनिकांपैकी द्रोणागिरी नोडमध्ये ६१, तर तळोजामध्ये २५१ अशा एकूणच ३१२ सदनिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत; तर द्रोणागिरीतील ३७४, तळोजा नोडमधील २,६३६ अशा एकूण ३,०१० सदनिका सर्वसाधारण घटकांसाठी आहेत. यांपैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या ३१२ सदनिकांसाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला आहे; परंतु, सर्वसाधारण घटकांच्या सदनिका अद्याप ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.