नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या ३३२२ घरांच्या योजनेकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे ही घरे विकण्यासाठी सिडकोच्या संबंधित विभागाकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्राहकांना सुलभरीत्या घरांची नोंदणी करता यावी, त्यांच्या शंकांचे निरसन करता यावे, या उद्देशाने सिडकोने द्रोणागिरी आणि तळोजा येथे किओस्क बुकिंग काउंटर सुरू केले आहेत.
गेल्या पाच वर्षांत सिडकोने विविध घटकांसाठी विविध गृहयोजनांच्या माध्यमातून जवळपास तीस हजार घरांची योजना जाहीर करून त्यांची संगणकीय सोडत काढली आहे; मात्र विविध कारणांमुळे हजारो घरे विक्रीविना पडून आहेत. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक घरे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. त्यांपैकी ३३२२ घरांची योजना प्रजासत्ताकदिनी जाहीर केली आहे. या उपलब्ध सदनिकांपैकी द्रोणागिरी नोडमध्ये ६१, तर तळोजामध्ये २५१ अशा एकूणच ३१२ सदनिका पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत; तर द्रोणागिरीतील ३७४ व तळोजा नोडमधील २,६३६ अशा एकूण ३,०१० सदनिका या सर्वसाधारण घटकांसाठी उपलब्ध आहेत. यांपैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या ३१२ सदनिकांसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे; परंतु, सर्वसाधारण घटकांसाठी असलेल्या ३०१० सदनिका अद्याप ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या घरांची विक्री करण्याच्या दृष्टीने सिडकोने तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये किओस्क बुकिंग काउंटर सुरू केले आहेत.
प्रशिक्षित कर्मचारी करणार मार्गदर्शनतळोजा आणि द्रोणागिरीतील घरांकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून विविध स्तरांवर जाहिरातबाजी सुरू आहे. यात आता बुकिंग काउंटरवरची भर पडली आहे. या काउंटरवर प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त केले आहेत. ते ग्राहकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच त्यांना योजनेची माहिती देऊन अर्जनोंदणीसाठी सहकार्य करणार आहेत. ज्या अर्जदारांना घरासाठी ऑनलाइन नोंदणी करणे शक्य नसेल किंवा ऑनलाइन नोंदणीच्या वेळी काही अडचणी येत असतील तर, अशा अर्जदारांना किओस्क बुकिंग काउंटर उपयुक्त ठरेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.