पनवेल : पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी ४२ नामांकन अर्ज वैध ठरले, तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ८० अर्ज वैध ठरले आहेत. पंचायत समितीसाठी वावंजे गणातील एकनाथ देशेकरांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे आता शेकाप व भाजपा यांच्यात ‘काटे की टक्कर’ होण्याची शक्यता, वर्तवण्यात येत आहे.पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आठही जागांवर भाजपा व शेकापने आपले उमेदवार उभे केले आहेत. सेनेला पाली-देवद व पळस्पे येथे उमेदवार उभे करता आलेले नाहीत; पण त्या ठिकाणी बहुजन समाज पार्टी व भारिप बहुजन महासंघाने उमेदवार उभे केले आहेत. जिल्हा परिषदेसाठी आघाडीतील राष्ट्रवादीला एकही जागा शेकाप पक्षाने सोडलेली नाही. जिल्हा परिषदेसाठी भाजपा व शेकापमध्ये मुख्य ती लढत होणार हे निश्चित आहे. पंचायत समितीच्या १६ जागांसाठी भाजपाने १६, शेकाप पक्षाने १३, तर सेना १२, राष्ट्रवादी ४ जागांवर निवडणूक लढवत आहे. करंजाडे गणात चारी पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या ठिकाणी सेनेने दोन अर्ज दाखल केले आहेत. वावंजे गणात माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर यांचा अर्ज मतदार यादीत नाव नसल्याने बाद झाला. या मतदार संघातून शेकाप पक्षाचे काशीनाथ पाटील निवडणूक लढवत आहेत. बहुमत मिळाल्यास शेकाप पक्षाचे काशीनाथ पाटील हे सभापती पदाचे उमेदवार असणार आहेत. देशेकर हे नुकतेच शेकाप पक्षातून भाजपामध्ये आले असल्याने व त्यांनी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केला होता. शेकापची बहुतांश धुरा ही ग्रामीण मतदारांवर आहे. आजपर्यंत याच मतदारांनी शेकापला पनवेल तालुक्यात सत्ता मिळवून दिली आहे. त्यानंतर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शेकाप पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यावर अनेक बदल झाले आहेत. पनवेलमध्ये शेकापचे वर्चस्व काहीसे कमी झालेले दिसते. मात्र शिक्षक मतदार संघातून शेकापचे बाळाराम पाटील विजयी झाल्याने पुन्हा शेकापला फिनिक्स पक्षाप्रमाणे गतवैभव मिळण्याची शक्यता आहे.
पनवेल तालुक्यात काटे की टक्कर!
By admin | Published: February 10, 2017 4:37 AM