सुखी आयुष्यासाठी अध्यात्माची जाण हवीच
By admin | Published: June 30, 2017 02:59 AM2017-06-30T02:59:37+5:302017-06-30T02:59:37+5:30
जीवन विद्या मिशद्वारे आयोजित वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात बुधवारी झालेल्या व्याखानामध्ये ‘शोध आनंदाचा’
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : जीवन विद्या मिशद्वारे आयोजित वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात बुधवारी झालेल्या व्याखानामध्ये ‘शोध आनंदाचा’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. ‘सुखी आयुष्याकरिता अध्यात्माची जाण असणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन प्रल्हाद पै यांनी केले. या वेळी नैराश्याचे वाढते प्रमाण, तरुणांमधील आत्मविश्वासाची कमतरता, मानवी दृष्टिकोन, पैशांच्या मागे धावणारी पिढी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
दुसऱ्याबद्दल चांगले विचार करायला शिका, चांगले बोला, चांगले वागा, निस्वार्थीपणे जगा, असा मोलाचा संदेश या ठिकाणी देण्यात आला. जोरदार पावसातही जीवन विद्या मिशनच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली. ‘शोध आनंदाचा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात जीवनातील खरा आनंद, सुखासाठी विज्ञान आणि विवेकाची सांगड याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या बुधवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये ‘शोध आनंदाचा’ ही व्याख्यानमाला राबविली जाणार असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली. जीवन विद्या मिशनमधील तरुण स्वयंसेवकांनी या ठिकाणी अनुभव सांगितले.
जीवन विद्या मिशनच्या वतीने विविध विभागांमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यश आणि आनंदाकरिता मानवी दृष्टीत कोनाचे महत्त्व सांगताना, ‘दृष्टिकोन हा लघुकोन असता कामा नये, तर तो नेहमी विशालकोन असावा’, असेही पै यांनी स्पष्ट केले. या वेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे, शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे आदी मान्यवर उपस्थित होते.