कामोठेतील नाला होणार बंदिस्त, सिडकोची केएलई महाविद्यालयाला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 01:18 AM2020-01-08T01:18:14+5:302020-01-08T01:18:18+5:30
कळंबोली वसाहतीतील कामोठे सिग्नलजवळील पावसाळी नाला जलधारण तलावाला जाऊन मिळतो.
कळंबोली : कळंबोली वसाहतीतील कामोठे सिग्नलजवळील पावसाळी नाला जलधारण तलावाला जाऊन मिळतो. त्याच्यावर केएलई महाविद्यालयाच्या वतीने सिडकोच्या परवानगीने स्लॅब टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
२६ जुलै २००५ नंतर पावसाचे पाणी वाहून नेण्याकरिता सिडकोने पावसाळी नाले बांधले. त्यापैकी केएलईपासून एक नाला जातो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, पाणी आणि दारूच्या बाटल्या, थर्माकोल, निरुपयोगी वस्तू टाकल्या जात आहेत. या नाल्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले असून, याच ठिकाणी सांडपाणी सोडण्यात येते, त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाणही वाढले आहे. खुल्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. म्हणून केएलई महाविद्यालयाने पुढाकार घेऊन नाल्यावर स्लॅब टाकून तो बंदिस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी सिडकोने परवानगी दिल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. सिडको अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे यांनीही हे काम महाविद्यालय करीत असल्याचे सांगितले.