आविष्कार देसाई लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कस्टमच्या जागेवरील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोळी समाजाच्या काही प्रतिनिधींनी सोमवारी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांची भेट घेऊन उघड्यावर पडणारे संसार वाचविण्याची विनंती केली. केंद्रीय मंत्र्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याने अतिक्रमणधारकांची धाकधूक मात्र वाढली आहे.‘दोनशे मच्छीमारांवर बेघर होण्याची वेळ’ या मथळ््याखाली लोकमतमध्ये सोमवार, २२ मे रोजी वृत्त प्रसिध्द झाले होते. त्यामुळे अतिक्रण करणारे मच्छीमार खडबडून जागे झाले. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांची पुन्हा एकदा धावपळ सुरू झाली आहे. अशीच धावपळ त्यांची १९९६-९७ साली झाली होती. कोळी समाजाच्या विविध बैठकांना जोर आला आहे.मच्छीमारांनी ज्या जागेवर अतिक्रमण केले आहे ती जागा कस्टम विभागाची असल्याने ती पुन्हा कस्टमच्या ताब्यात मिळावी यासाठी कस्टम विभागाने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी काहीच दिवसांपूर्वी अतिक्रमणधारकांना नोटिसाही बजावल्या आहेत. १५ दिवसांमध्ये जमीन खाली करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. यासाठी कस्टम विभागाने १९९६-९७ साली जिल्हा न्यायालयाने त्यांच्या बाजूने दिलेल्या निकालाचा आधार घेतला आहे.कस्टम विभागाकडून होणारी कारवाई तातडीने थांबावी यासाठी कोळी समाज एकवटला आहे. त्यांनी यातून लवकरच मार्ग काढण्यासाठी थेट केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांची सोमवारी पेण तालुक्यातील वडखळ येथील एका कार्यक्रमात भेट घेतली. नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती त्यांनी गीते यांना दिली. गीते यांनी प्रतिनिधींचे बोलणे ऐकून घेत‘मी यात लक्ष घालतो’ असे सांगितल्याचे परशुराम सारंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. केंद्रीय मंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने कोळी समाजाचे प्रतिनिधी काही अंशी निराश झाले. यातून तातडीने मार्ग निघणे गरजेचे असल्याने कोळी समाजातील लोकांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.
कोळी समाजाची उडाली तारांबळ
By admin | Published: May 23, 2017 2:09 AM