आपत्ती व्यवस्थापनास कोकण विभाग सज्ज; सातही जिल्ह्यांचा आराखडा तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 01:01 AM2020-05-29T01:01:28+5:302020-05-29T01:01:45+5:30
३७१ पूरप्रवण, २२३ दरडग्रस्त गावे
नवी मुंबई : कोकण महसूल विभागात ७ जिल्हे व ५० तालुक्यांचा समावेश आहे. ३७१ पूरप्रवण व २२३ दरडग्रस्त गावे या परिसरात आहेत. पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्भवू नये, यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली असून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोकण विभागात मान्सून काळात कोणतीही मोठी आपत्ती येऊ नये, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. महालक्ष्मी एक्स्प्रेससारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी रेल्वेच्या प्रवासापूर्वी संबंधित मार्गावर आपत्ती व्यवस्थापनाचा सल्ला घ्यावा, अशी सूचना महसूल विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी केली.
मान्सूनपूर्व तयारीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २६ मे रोजी बैठक झाली. या आॅनलाइन बैठकीत दौंड बोलत होते. बैठकीत नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, उपायुक्त महसूल सिद्धाराम सालीमठ, उपायुक्त मनोज रानडे व इतर अधिकारी उपस्थित होते. दौंड यांनी सांगितले की, कोकण विभागात एकूण ७ जिल्हे असून ५० तालुके आणि ६ हजार ३५३ गावे आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक म्हणजे सरासरी २ हजार ते ३ हजार ३६८ मि.मी. पाऊस कोकणात पडतो. विशेषत: मुंबई व ठाणे जिल्ह्यात कमी कालावधीत जास्त पाऊस आणि भरतीची वेळ एकच असल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.
कोकण विभागात गेल्या सहा वर्षांत सरासरी २ हजार ७०१.४० मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. विभागात एकूण ३७१ पूरप्रवण व २२३ दरडग्रस्त गावे आहेत. या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनेची पूर्वतयारी करण्यात आली आहे. यासाठी गावोगावी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.
नागरी क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी करण्यात आली आहे. यासाठी आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नाले आणि गटारसफाईच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. पूर नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. साथ रोगांचे नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक औषधसाठा व जंतुनाशके फवारणीचे नियोजन, धोकादायक इमारतींबाबत उपाययोजना, रस्ते व पूल दुरुस्ती, आपदग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय, आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचे अद्ययावती केले आहे.
आरोग्य विभाग आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी करण्यात आली आहे. यासाठी कोविड-१९ साथरोग नियंत्रण व उपचारात सातत्य राखणे, २४७ आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करणे, पावसाळी साथ रोगांसाठी पुरेसा औषधांचा साठा, सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, रुग्णवाहिकांची उपलब्धता, आरोग्य शिबिरांचे नियोजन, जल तपासणीसाठी प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आली आहे.
लाइफ जॅकेटसह बोटी तयार
भविष्यात उद्भवणाºया नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी कोकण विभागातील जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे लाइफ जॅकेट ११६६, बोटी ७७, लाइफ बोटी ८४२ एवढी सुस्थितीत असलेली साधन सामग्री उपलब्ध आहे.
- शिवाजी दौंड, आयुक्त, कोकण महसूल विभाग
कोकण विभागात महत्त्वाचे प्रकल्प
च्कोकण विभागात ठाणे जिल्ह्यात मोठे ४, पालघर जिल्ह्यात मोठे ३, रायगड जिल्ह्यात मोठे २, लघू प्रकल्प २८, रत्नागिरी जिल्ह्यात मोठे २, लघू प्रकल्प ४६, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा १, मध्यम प्रकल्प १, लघू प्रकल्प २३ असे एकूण मोठे १०, मध्यम ३ आणि लघू प्रकल्प ९७ आहेत. या धरणांच्या पाणीसाठ्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.