महसूल वसुली करताना कोकण विभागाची कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 11:49 PM2019-03-03T23:49:15+5:302019-03-03T23:49:22+5:30
कोकण विभागाने सरत्या आर्थिक वर्षातील महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या विभागाने १०३५ कोटींचा महसूल वसूल केला आहे.
नवी मुंबई : कोकण विभागाने सरत्या आर्थिक वर्षातील महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या विभागाने १०३५ कोटींचा महसूल वसूल केला आहे. विशेष म्हणजे, होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता शासकीय तिजोरीवर ताण पडू नये, या उद्देशाने या विभागाला या सरत्या वर्षात २५३४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
राज्यातील एकूण महसुली विभागापैकी कोकण विभागाकडून सर्वाधिक महसूल जमा होतो. राज्याच्या महसूल विभागातर्फे एकूण महसूल वसुलीचे वार्षिक उद्दिष्ट साधारण सात हजार ५०० कोटींच्या घरात आहे. यातील जवळपास ४० टक्के महसूल हा कोकण महसूल विभागाकडून राज्याच्या तिजोरीत जमा केला जातो. कोकण महसुली विभागात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यांचा समावेश आहे. कोकण महसूल विभागातून हे उत्पन्न, जमीन महसूल, वाळू, माती, गौण खनिज उत्खनन, शिक्षण कर, रोजगार कर, आदी बाबीतून वसूल करण्यात येतो. दरम्यानच्या काळात वाळू लिलाव थंडावल्याने महसूल वसुलीचा वेग मंदावला होता. मात्र, वाळू लिलावाला सध्या सुरुवात झाल्याने महसूल वसुलीचा वेग वाढला आहे.
चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर २0१८ पर्यंत ४१५ कोटी रु पये महसूल जमा झाला आहे. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टापैकी उर्वरित रक्कम अवघ्या पाच महिन्यांत म्हणजेच फेब्रुवारी २०१९ पर्यंत वसूल करण्याचे उद्दिष्ट कोकण विभागातील अधिकारी-कर्माचाऱ्यांसमोर होते; परंतु हे उद्दिष्ट पूर्ण करताना या विभागाला कसरत करावी लागली. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत अडीच हजार कोटींपैकी केवळ १०३५ कोटी महसूल गोळा करण्यात या विभागाला यश आले आहे.