'घरोघरी तिरंगा' अभियानासाठी कोंकण विभाग सज्ज- डॉ. महेंद्र कल्याणकर

By नामदेव मोरे | Published: August 5, 2022 08:16 PM2022-08-05T20:16:02+5:302022-08-05T20:16:42+5:30

डॉ. महेंद्र कल्याणकर हे कोकण विभागीय आयुक्त

Konkan division is ready for Har Ghar Tiranga campaign says Konkan Divisional Commissioner Mahendra Kalyankar | 'घरोघरी तिरंगा' अभियानासाठी कोंकण विभाग सज्ज- डॉ. महेंद्र कल्याणकर

'घरोघरी तिरंगा' अभियानासाठी कोंकण विभाग सज्ज- डॉ. महेंद्र कल्याणकर

Next

नामदेव मोरे, नवी मुंबई: भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत कोकण विभागातील घरे, सरकारी/खाजगी आस्थापना तसेच ग्रामीण भागातील राष्ट्र ध्वजाची एकूण मागणी संख्या 37 लाख 39 हजार 118 असून त्यापैकी 30 लाख 59 हजार 502  ध्वज उपलब्ध आहेत.  केंद्र शासनाकडून 8 लाख 79 हजार 444 ध्वजांची वाढीव मागणी करण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त (अतिरिक्त कार्यभार)  डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

“हर घर तिरंगा” उपक्रमाच्या प्रचार प्रसिध्दी व जनजागृतीसाठी कोकण भवन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी उपायुक्त मकरंद देखमुख, उपायुक्त रविंद्र जाधव, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे आणि मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

पत्रकारांशी संवाद साधतांना  डॉ. कल्याणकर म्हणाले की,  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा दि. 9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे विविध उपक्रम राबवून साजरा होतो आहे.   या महोत्सवाचा भाग म्हणून कोकण विभागात “घरोघरी तिरंगा”  हा अत्यंत महत्त्वकांशी उपक्रम दि.13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान राबविण्यत येणार आहे. “घरोघरी तिरंगा”  हा उत्सव प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा व समाजातील सर्वस्तरातील जनतेमध्ये  देशाभिमान जागृत करणारा व स्वातंत्र्य संग्रामात हुतात्म्य पत्करलेल्या विरांपासून प्रेरणा घेणारा आहे.  हा उत्सव साजरा करताना लोकसहभाग हा या कार्यक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण त्यात लोकांच्या भावना, विचार व मते जुळलेली आहेत.

“घरोघरी तिरंगा” उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात ध्वज उपलब्ध करून देण्यासाठी व्यापारी बांधव, विविध संस्था-संघटनांची मदत मिळविण्यात येत आहे. या उपक्रमात ध्वजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ध्वजसंहितेचे पालन व्हावे. ध्वज स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावावा. सूत, लोकर, पॉलिस्टर, सिल्कचा ध्वज लावता येईल.  प्लास्टिकचा असू नये.  त्याचा आकार ३×२ असावा.  ध्वज मळलेला किंवा फाटलेला नसावा, ध्वजसंहितेचे पालन व्हावे.   दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरवाची आवश्यकता नाही. मात्र शासकीय कार्यालयांना या संबंधी ध्वजसंहितेचे पालन करावे लागणार असल्याचे आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी सांगितले.

“घरोघरी तिरंगा” उपक्रमाची प्रचार व प्रसिद्धी- सदर उपक्रमाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी प्रत्येक सरकारी अधिकारी , कर्मचारी , शिक्षक, सेवा मंडळे, लोक प्रतिनिधी यांचा सहभाग व सहकार्य घेण्यात येणार आहे.  यामध्ये पोस्टर्स व बॅनर्स लावणे, शाळामधुन मुलांच्या स्पर्धा घेणे, प्रभात फेऱ्या काढणे इ. बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. तिरंगा स्वयंसेवकाच्या नेमणुका करुन त्यांच्या मार्फत कार्यक्रमाची प्रचार प्रसिध्दी व अंमलबजावणी करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर मोक्याच्या ठिकाणी जसे बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालये, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळी होर्डिंग/बॅनर्स लावण्यात आली आहे. जिल्हयातील शासकिय इमारती, ऐतिहासिक वास्तूंना तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. गावस्तरावरील “घरोघरी तिरंगा” फडकवल्याचे ड्रोनद्वारे फोटो घेणे व व्हिडीओ शुटींग करण्यात येईल.

“घरोघरी तिरंगा” उपक्रमाची अंमलबजावणी ही दि . 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत करण्यात येणार असल्याने या सप्ताहात घ्यावयाच्या विविध कार्यक्रमांचे उदा. स्वच्छता मोहिम, महिला मेळावे, अर्थ साक्षरता, शेतकरी मेळावे, इ. बाबत तारीखवार कार्यक्रम घेण्याबाबत विभागस्तरावरुन सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राव्दारे निर्देशीत करण्यात आल्याचेही आयुक्त यांनी यावेळी सांगितले. हा उपक्रम संपूर्ण कोकण विभागात यशस्वी करण्यासाठी नागरिकांना सहभागाचे आवाहन आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी  केले.

Web Title: Konkan division is ready for Har Ghar Tiranga campaign says Konkan Divisional Commissioner Mahendra Kalyankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.