कातकरी उत्थानाचा कोकण पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:45 AM2017-12-27T02:45:31+5:302017-12-27T02:45:34+5:30
नवी मुंबई : कातकरी समाजाला विकासाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी कोकण आयुक्त डॉ. जगदिश पाटील यांनी कातकरी उत्थान अभियान राबविले आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : कातकरी समाजाला विकासाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी कोकण आयुक्त डॉ. जगदिश पाटील यांनी कातकरी उत्थान अभियान राबविले आहे. चार महिन्यांत चार जिल्ह्यांतील २५ हजारापेक्षा जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. सर्व दाखले उपलब्ध करून देण्याबरोबर नागरिकांचे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
राज्यातील विकासापासून वंचित असलेल्या घटकांमध्ये कातकरी समाजाचाही समावेश होतो. कातवडी, काथोडी, काथेडीया नावानेही हा समाज ओळखला जातो. पूर्वी कात तयार करणे, हा या भटक्या आदिवासी समाजाचा मूळ व्यवसाय होता. जंगलात राहायचे. शिकार करायची, कात तयार करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह केला जात होता. धेड, सिधी, सोन, वरप, अथावर अशा पाच पोटविभागांमध्ये हा समाज विभागाला गेला आहे. औद्योगिकीकरणामुळे कात बनविण्याचा रोजगार बंद झाला. शिकार करण्यावर कायद्याने बंदी आल्यामुळे रोजगाराचा मार्गच बंद झाला. अनेकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली. सरकारी योजनांच्या लाभापासूनही हे नागरिक वंचित राहू लागले. रायगड, रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांतील कातकरी समाजाला शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी व त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोकण आयुक्त जगदिश पाटील यांनी कातकरी उत्थान अभियान सुरू केले आहे. चार महिन्यांपूर्वी हे अभियान सुरू केले. थेट कातकरी समाजापर्यंत पोहोचणे हेच या अभियानाचे मूळ उद्दिष्ट. तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, कृषी विभागाचे कर्मचारी अशा चार जणांचे पथक तयार करण्यात आले. थेट कातकरी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. यासाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली. शिबिरामध्येच नागरिकांना दाखल्यांचे वाटप करण्यात येऊ लागले.
दाखले उपलब्ध करून देण्याबरोबर कातकरी समाजातील नागरिकांना उपजीविकेचे साधन निर्माण करण्यासाठी १० ते १२ गावांचा गट तयार करण्यास सुरुवात झाली. नागरिकांमध्ये कौशल्य विकासाची संधी निर्माण करून देण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी कातकरी बांधव भातशेती करत आहेत. भातशेती हे एकमेव पीक घेता येते. भात काढणी झाली की उर्वरित आठ महिने उपजीविकेसाठी दुसरा पर्याय राहात नाही. यामुळे नागरिक उपजीविकेसाठी शहरात व इतर ठिकाणी स्थलांतर करत असतात. या अभियानातून स्थलांतर थांबविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. किमान महिला व मुलांचे स्थलांतर होऊ नये. मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून त्यासाठी नोडल अधिकाºयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कातकरी विकासाचा कोकण पॅटर्न राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे.
>जन्म नोंदणीसाठी
वैद्यकीय तपासणी
कातकरी समाज काही ठिकाणी अल्पशिक्षित आहे. अनेकांची जन्म नोंदणी केलेली नाही. यामुळे वयाचे दाखले देण्यात अडचणी निर्माण होतात. ही समस्या सोडविण्यासाठी अभियानामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
वैद्यकीय तपासणी करून वय निश्चित करण्यात आले. वैद्यकीय तपासणी शिबिरामधून ४०६३ नागरिकांना दाखले देण्यात आले आहेत.
यामध्ये ठाण्यामध्ये २६३९, पालघर १०५३, रायगड ३७१ दाखल्यांचा समावेश आहे.
यामधील ५३१ नागरिकांचे वय वैद्यकीय तपासणी करून निश्चित करण्यात आले. यामध्ये ठाण्यातील ४०४ व रायगडमधील १२७ नागरिकांचा समावेश आहे.
>विभागीय कोकण आयुक्त डॉ. जगदिश पाटील यांनी कातकरी समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी कातकरी उत्थान अभियान सुरू केले. या माध्यमातून हजारो नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप केले आहे. कातकरी समाजाच्या विकासाचा नवीन कोकण पॅटर्न तयार झाला आहे.
- डॉ. गणेश मुळे, उपसंचालक (माहिती), कोकण विभाग
जातीच्या दाखल्यांचा तपशील
एकूण द्यावयाचे दाखले ५३७९३
यापूर्वीचे वाटप २३५२८
अभियानात पूर्वीचे वाटप ६३३३
अभियानातील वाटप १०६८४
ज्येष्ठ नागरिक दाखला
एकूण दाखले वाटप ५९४
ठाणे ३८४
पालघर ७०
रायगड १३६
रत्नागिरी ०४
वय व अधिवास दाखला
ठाणे १५७४
पालघर २४८
रायगड ३४३
रत्नागिरी ०५
एकूण २१७०
उत्पन्नाचा दाखला
ठाणे ५६४
पालघर ८०८
रायगड ४८९
रत्नागिरी ३१
एकूण १८९२
आधार कार्ड नोंदणी
ठाणे १६८४
पालघर ४०९७
रायगड ७८९
रत्नागिरी ०८
एकूण ६५७८
मतदार ओळखपत्र
ठाणे १४४
पालघर ६८५
रायगड ११५२
रत्नागिरी ०६
रेशन कार्ड नाव वगळणे व सामावणे
ठाणे ४९९
पालघर ७७७
रायगड ३५६
रत्नागिरी ०८
एकूण १६४०
संजय गांधी योजना
ठाणे २१५
पालघर ९७
रायगड ११९
रत्नागिरी ०१
मनरेगा जॉब कार्ड
ठाणे २८९
पालघर ९०
रायगड १३१