कोकण रेल्वे ३३ व्या वर्षी सर्वच क्षेत्रात झाली मालामाल
By नारायण जाधव | Published: October 16, 2023 09:27 PM2023-10-16T21:27:41+5:302023-10-16T21:27:51+5:30
या कार्यक्रमात उल्लेखनीय कामासाठी कोकण रेल्वे जनसंपर्क विभागालादेखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नवी मुंबई : कोकणच्या विकासात मैलाचा दगड ठरलेल्या कोकण रेल्वेने आपला ३३ वा स्थापना दिवस सोमवारी मोठ्या उत्सहात साजरा केला. तो साजरा करीत असताना कोकण रेल्वे प्रवासी, मालवाहतुकीसह सर्वच क्षेत्रात मालामाल झाली आहे. स्थापना दिन समारंभात कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी उपक्रमाची माहिती दिली.
यानुसार कोकण रेल्वेने आपल्या मार्गाचे १०० विद्युतीकरण पूर्ण केले आहे. शिवाय आतापर्यंतचा सर्वाधिक प्रवासी महसूल – ९६३.४३ कोटी, सर्वाधिक मालवाहतूक महसूल – ७६७.४७ कोटी, सर्वाधिक प्रकल्प महसूल – ३२७४.७० कोटींसह आतापर्यंतचा सर्वाधिक एकूण महसूल – ५१५२.२३ कोटी रुपये कमाविला असून उपक्रमास आतापर्यंतचा सर्वोच्च निव्वळ नफा – २७८.९३ कोटी रुपये झाला आहे. याशिवाय या वर्षी कोकण रेल्वेने मूळ लोडिंगमध्ये ३० % वाढ केली आहे, जीमूळ लोडिंगमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक आहे.
यानिमित्ताने कोकण रेल्वे व्यवस्थापनाच्या २५ वर्षांच्या अखंडित सेवापूर्ती निमित्त महामंडळातील अधिकारी-कर्मचारी यांचा विशेष सत्कार कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग (फायनान्स), संतोष कुमार झा (ऑपरेशन्स,कमर्शिअल), आर. के हेगडे (वे-वर्कस्) व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कोकण रेल्वेचे उप-महाव्यवस्थापक (जनसंपर्क) गिरीश करंदीकर, कार्यकारी संचालक (प्रकल्प) एल. प्रकाश, डेप्युटी लेखा अधिकारी अरुप बागुल यांच्यासह विविध विभागात उल्लेखनीय काम केलेल्या विभागांना तसेच वैयक्तिक कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उल्लेखनीय कामासाठी कोकण रेल्वे जनसंपर्क विभागालादेखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.