- कमलाकर कांबळेनवी मुंबई - कोकण रेल्वे मार्गावरील विन्हेरे - चिपळूण आणि मडुरे - मडगाव जंक्शन या विभागादरम्यान दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी ३१ ऑक्टोबर रोजी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे या काळात या दोन्ही विभागातून धावणाऱ्या सहा गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.
विन्हेरे - चिपळूण विभागात ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:१० ते ३:१० या वेळेत दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे कोईम्बतूर ते जबलपूर ( ०२१९७) या गाडीचा ३० ऑक्टोबर रोजी सुरू होणार प्रवास मडगाव जंक्शन - मडगावदरम्यान ९० मिनिटांसाठी स्थगित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सावंतवाडी रोड - दिवा ( १०१०६) या एक्स्प्रेसचा ३१ ऑक्टोबर रोजी सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड ते चिपळूण स्टेशनदरम्यान ९० मिनिटांसाठी नियमित केला जाणार आहे.
याच दिवशी मडुरे - मडगाव जंक्शनदरम्यान दुपारी १:२० ते ४:२० या तीन तासांत दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या चार गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन ( १२०५१) या जनशताब्दी एक्स्प्रेसचा ३१ ऑक्टोबर रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी - सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान १ तास २० मिनिटांसाठी रोखून धरला जाणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन (२२११९) या तेजस एक्स्प्रेसचा प्रवास सुद्धा रत्नागिरी ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान ६० मिनिटांसाठी नियमित केला जाणार आहे. निजामुद्दीन - एर्नाकुलम जंक्शन (१२६१८) या गाडीचा ३० ऑक्टोबर रोजी सुरू होणारा प्रवास कणकवली स्थानकावर २० मिनिटांसाठी रोखून धरला जाणार आहे. तसेच एर्नाकुलम जंक्शन - पुणे जंक्शन ( २२१४९) या गाडीचा ३० ऑक्टोबर रोजी सुरू होणार प्रवास कारवार - मडगाव जंक्शन स्थानकादरम्यान ५५ मिनिटांसाठी नियमित केला जाणार आहे.