नवी मुंबई : राजापूर रोड ते सिंधुदुर्ग विभागादरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेने शुक्रवार, १५ मार्च रोजी अडीच तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे मुंबई-मडगावसह या विभागातून धावणाऱ्या पाच गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.
मेगा ब्लॉकमुळे मडगाव जंक्शन-सावंतवाडी रोड (५०१०८) या गाडीचा १५ मार्च रोजीचा पूर्वनियोजित प्रवास सांयकाळी ७:३० वाजता म्हणजेच ८० मिनिटे उशिराने सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेसचा १५ मार्च रोजीचा पूर्वनियोजित प्रवास २ तास ०५ मिनिटे उशिराने सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे मडगाव जंक्शन-सीएसएमटी (१०१०४) या मांडोवा एक्स्प्रेसचा १५ मार्च रोजी सुरू होणारा प्रवास करमाळी आणि सावंतवाडी रोडदरम्यान २० मिनिटे रोखून धरला जाणार आहे.
तर मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन (१२०५१) या जनशताब्दी एक्स्प्रेसचा १५ मार्च रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान २० मिनिटे स्थगीत केला जाणार आहे. तसेच सीएसएमटी-मडगाव जंक्शन (२२११९) या तेजस एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान २० मिनिटे रोखून धरला जाणार आहे, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.