आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या
By कमलाकर कांबळे | Published: February 24, 2024 09:22 PM2024-02-24T21:22:51+5:302024-02-24T21:23:08+5:30
गाड्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.
नवी मुंबई : कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेली आंगणेवाडी यात्रा २ मार्चला होणार आहे. दीड दिवसाच्या या यात्रेला लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.
यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक येतात, ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने १ ते ३ मार्चला दोन्ही मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी (०१०४३) ही विशेष गाडी शुक्रवार, १ मार्चला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री १०:१५ वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता करमाळी स्थानकावर पोहचेल. करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस (०१०४४) ही विशेष गाडी ३ मार्चला करमाळी स्थानकावरून दुपारी ३:२० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता ही गाडी लोकमान्य टिळक स्थानकावर पोहचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल.