कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या सप्टेंबरपर्यंत, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विविध उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 06:33 AM2024-03-26T06:33:24+5:302024-03-26T06:33:41+5:30
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जातात.
नवी मुंबई : विशेष बाब म्हणून होळीसाठी सुरू करण्यात आलेल्या नागपूर-मडगाव जंक्शन नागपूर या द्वि-साप्ताहिक विशेष गाड्यांची सेवा सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. यापूर्वी ही सेवा ३१ मार्चपर्यंत निर्धारित केली होती. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने या सेवेचा ९ जूनपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जातात. विशेषत: सणासुदीच्या दिवसांत विविध मार्गांवर अतिरिक्त गाड्या चालवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून होळीसाठी विशेष बाब म्हणून नागपूर - मडगाव जंक्शन (०११३९) आणि मडगाव जंक्शन - नागपूर (०११४०) या द्वि-साप्ताहिक गाड्या चालविल्या जात आहेत. ३१ मार्चपर्यंत या गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने जाहीर केला होता. परंतु, आता त्या ९ जूनपर्यंत चालविल्या जाणार आहेत.
सुधारित वेळापत्रकानुसार नागपूर - मडगाव जंक्शन ही गाडी ३ एप्रिल ते ८ जून या दरम्यान आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच बुधवारी आणि शनिवारी धावणार आहे, तर मडगाव जंक्शन - नागपूर ही विशेष गाडी ४ एप्रिल ते ९ जून या कालावधीत पावसाचे दिवस वगळता प्रत्येक गुरूवारी आणि रविवारी असे आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.
मान्सूनमध्ये गाड्यांचे नियाेजन
जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते. त्यामुळे या काळातसुद्धा नागपूर - मडगाव जं. - नागपूर मार्गावर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.
या गाड्या १२ जून ते ३० जून दरम्यान धावणार आहेत. नागपूर -मडगाव जंक्शन (०११३९) ही द्वि-साप्ताहिक विशेष गाडी नागपूर येथून बुधवारी आणि शनिवारी दुपारी ३:०५ मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:४५ वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. त्याचप्रमाणे मडगाव जंक्शन - नागपूर ही द्वि-साप्ताहिक गाडी १३ ते ३० जून या कालावधीत गुरूवारी, रविवारी सायं. ७ वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९:३० वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी वर्धा जंक्शन, पुलगाव, शेगाव, मलकापूर, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, करमाळीसह अन्य स्थानकांवर थांबेल.