कोकण रेल्वेचा साडेनऊ हजार फुकट्या प्रवाशांना दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 09:15 PM2024-02-13T21:15:34+5:302024-02-13T21:16:03+5:30
जानेवारीत २.१८ कोटी दंड वसूल.
नवी मुंबई : कोकण रेल्वेच्या विविध मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात कोकण रेल्वेने धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात तब्बल ९५४८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. याअंतर्गत संबंधितांकडून २ कोटी १७ लाख ९७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोकण रेल्वेच्या विविध मार्गावरील गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रत्येक गाड्यांतून नियमित तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. या पथकाने जानेवारी महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या ९५४८ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे २ कोटी १८ लाखांचा दंड वसूल केला आहे. तर ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या चार महिन्यात तपासणी मोहिमेत २८,०१४ प्रवासी विनातिकीट आढळून आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करून ७ कोटी ७८ लाख ९६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
प्रत्येक गाडीत करणार तपासणी
प्रत्येक मार्गावरील गाड्यांतून ही तपासणी मोहीम सुरूच राहणार असून, गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.