नवी मुंबई : कोकण रेल्वेने फुकट्या प्रवाशांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात ७०१३ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोकण रेल्वेच्या या मोहिमेमुळे फुकट्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत. विविध मार्गांवर धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
परंतु विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांनी कोकण रेल्वे समोर आव्हान निर्माण केले आहे. अशा फुकट्या प्रवाशांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी कोकण रेल्वेने धडक मोहीम सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्यात राबवलेल्या अंतर्गत तपासणी मोहिमेत कोकण रेल्वेच्या विविध मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणारे ७०१३ फुकटे प्रवासी आढळून आले आहेत. या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात येत्या काळात मोहीम तीव्र केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट घेऊन स्वाभिमानाने प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.