कोपरखैरणेत पडीक रोहाऊसला लागली आग
By admin | Published: December 31, 2016 04:30 AM2016-12-31T04:30:51+5:302016-12-31T04:30:51+5:30
अपूर्ण बांधकामामुळे पडीक असलेल्या रोहाऊसमध्ये आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी कोपरखैरणेत घडली. या घटनेमध्ये रोहाऊसच्या समोर उभी असलेली कार देखील
नवी मुंबई : अपूर्ण बांधकामामुळे पडीक असलेल्या रोहाऊसमध्ये आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी कोपरखैरणेत घडली. या घटनेमध्ये रोहाऊसच्या समोर उभी असलेली कार देखील जळाली आहे, तर ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोपरखैरणे सेक्टर ७ येथील लायन्स क्लब रुग्णालयाच्या मागील बाजूला हा प्रकार घडला. अनेक वर्षे बांधकाम अपूर्ण राहिल्यामुळे हे रोहाऊस पडीक झाले होते. याठिकाणी एक बेघर महिला दोन मुलींसह रहात होती. परिसरातील अनेकांनी दिला जुने कपडे दिल्याने याठिकाणी कपड्यांचा ढीग साचला होता.
शुक्रवारी सकाळी त्याठिकाणी आग लागल्याने या कपड्यांनी पेट घेतला. काही वेळातच आग रोहाऊसच्या संपूर्ण जागेत पसरल्याने समोरच उभ्या असलेल्या कारने देखील पेट घेतला. राहत्या ठिकाणी वाहन पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे संबंधिताने ती कार त्याठिकाणी उभी केलेली होती. दरम्यान, कारने पेट घेतल्यानंतर टायर फुटल्याचे स्फोटासारखे आवाज येत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. शिवाय ही आग लगतच्या इतर रोहाऊसमध्ये देखील पसरण्याची शक्यता निर्माण झालेली. आगीची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाचे जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडून पुरेपूर प्रयत्न झाले. यामुळे ही आग वेळीच आटोक्यात येवून मोठी दुर्घटना टळली. (प्रतिनिधी)