वैभव गायकर
पनवेल : पांडवकडा धबधब्याचे पाणी वाहून नेणाऱ्या मुख्य नाल्यावर सिडकोने उभारलेले कोपरा पूल सध्याच्या घडीला वाहत्या पाण्याला सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. याच कारणामुळे सोमवारी नाला फुटून पाणी सायन-पनवेल महामार्गावर आले होते. सिडकोने उभारलेल्या या पर्यायी पुलाच्या पाइपमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण झाला होता.
मुख्य नाल्यावर पाइपच्या आधारावर पूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे पाइपमध्ये कचरा साचल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. अतिवृष्टीमुळे कोपरा येथील वळणावर मोठ्या प्रमाणात दबाव आल्याने कोपरा नाला फुटला. नाला फुटल्याने सायन-पनवेल महामार्ग पूर्णपणे जलमय झाला होता. या मार्गावर तीन ते चार फूट पाणी साचले होते. दोन तास महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाले होते. अशा परिस्थितीत कोपरा गावाला पुराचा धोका निर्माण झाला होता. दुपारी पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थितीत पूर्ववत झाली. या वेळी पालिका व सिडकोच्या कर्मचाऱ्यांनी पाइपमधील कचरा काढल्यानंतर पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला. मंगळवारीही सिडको व महापालिकेमार्फत फुटलेला नाला दुरुस्तीचे काम सुरूच होते. मात्र, या घटनेनंतर सिडकोचे नियोजन कुठे तरी चुकले असल्याचे दिसून आले. मागील वर्षभरापासून कोपरा येथे नाल्याचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू आहे. मात्र, विविध अडथळ्यामुळे सिडकोला त्याचे काम पूर्ण करता आले नाही. सिडकोच्या नियोजनातील त्रुटींमुळे सर्वसामान्यांना फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे कोणत्याही वेळी या घटनेची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ शकते, त्यामुळे सिडकोने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सक्षम उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.
खारघर नोड हे सिडकोने पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित केलेले नाहीत, त्यामुळे विविध कामे करण्यासंदर्भात सिडको प्रशासन चालढकल करीत आहे. लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांनी सिडकोला वेळोवेळी पत्र देऊन यासंदर्भात खबरदारी घेण्याची विनंती केली होती. सहा दिवसांपूर्वी याच ठिकाणचा नाला खचला होता. मध्यरात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली होती. मात्र, या घटनेकडे सिडकोने दुर्लक्ष केल्याने सोमवारी उद्भवलेल्या पूरजन्य स्थितीचा सामना सर्वांना करावा लागला.