कोथळीगडाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष, संवर्धनासाठी प्रयत्नच नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 12:02 AM2020-01-09T00:02:36+5:302020-01-09T00:02:47+5:30
स्वराज्याचे शस्त्रागार म्हणून इतिहासात नोंद असलेल्या कोथळीगडाकडे केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : स्वराज्याचे शस्त्रागार म्हणून इतिहासात नोंद असलेल्या कोथळीगडाकडे केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. संरक्षित स्मारक म्हणून येथील गुहेची नोंद करण्यात आली असली, तरी संपूर्ण गडाच्या संवर्धनासाठी काहीही खर्च केला जात नाही. गडाचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शिवप्रेमींनी विशेषत: सह्याद्री प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. तीन वर्षांपासून संवर्धन मोहिमा राबविल्या जात आहेत. गडावरील तोफांना लाकडी गाडा तयार केला असून, नुकताच गडावर दरवाजाही बसविण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यामधील पेठचा किल्ला अर्थात कोथळीगडास मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शस्त्रसाठा ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. रायगड जिल्ह्यामधील कर्नाळा, इरशाळगड, कलावंतीन दुर्ग व कोथळीगडाच्या शिखरावरील दगडी सुळका ट्रेकर्सना आकर्षित करत असतो. इतर सर्व गडांवर कातळ फोडून शिखरावर जाण्यासाठी पायऱ्या किंवा वाट बनविण्यात आली आहे; परंतु कोथळीगडावर मात्र खडक फोडून आतमधून शिखरापर्यंत जाणारा पायरी मार्ग तयार करण्यात आला आहे. यामुळे देशभरातील शिवभक्त या खडकामधून मार्ग पाहण्यासाठी गडाला भेट देत असतात. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित स्मारकाच्या यादीमध्ये या गडाचाही समावेश केला आहे; परंतु प्रत्यक्षात गडावरील संरक्षित स्मारकाचा फलक वगळता इतर काहीही काम अद्याप करण्यात आलेले नाही. पुरातत्त्व विभागाच्या पाटीवरील मजकूरही पुसला गेला असून, नवीन फलक लावण्याची तसदीही अद्याप घेण्यात आलेली नाही. शिवप्रेमींनी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप गड संवर्धनासाठी फारसे प्रयत्न करण्यात आलेले नाहीत.
स्वराज्याचे शस्त्रगार म्हणून ओळख असलेल्या या गडाचे संवर्धन करण्यासाठी जवळपास तीन वर्षांपासून सह्याद्री प्रतिष्ठानने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रतिष्ठानच्या कर्जत विभागाच्या वतीने महिन्यातून किमान दोन वेळा संवर्धन मोहीम राबविली जात आहे.
गडावरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई केली जात आहे. दरवाजा, पायरी मार्ग, गुहा, भुयारी मार्ग, शिखरावरील तलाव व इतर दुरुस्तीची कामेही केली जात आहेत. गडाच्या पायथ्याशी असलेल्या उखळी तोफेला लाकडी गाडा तयार करण्यात आला आहे. गडावरील दोन तोफा बुरुजावर सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यांनाही लाकडी गाड्यावर बसविण्यात आल्या आहेत.
दोनपैकी एक लोखंडी व एक पितळी तोफ आहे. गडाच्या बालेकिल्ल्यावर प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच दरवाजा बसविण्यात आला आहे. पेठ गावातून गडावर जाणाºया मार्गावर जवळपास नुकतीच विरगळ आढळून आली असून, तीही सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुरातत्त्व विभागाने साथ दिल्यास कोथळीगडाचे बुरूज व इतर अवशेष टिकविण्यास मदत होऊ शकते, असे मत शिवप्रेमींनी व्यक्त केले आहे.
>काय आहे गडावर
कोथळीगडावर जाताना पेठ गावामध्ये उकळी तोफ पाहावयास मिळते. गडावर दोन तोफा आहेत. गडावर जाणाºया वाटेवर एक विरगळ पाहावयास मिळते.
गडाच्या शिखरावर जाण्यासाठी खडक फोडून पायऱ्यांचा भुयारी मार्ग तयार केला आहे. गडाच्या चारही बाजूला खडकामध्ये पाण्याचे टाके तयार केली आहेत.
वर्षभर गडावर पाणी उपलब्ध असून, उन्हाळ्यात पेठ गावाला येथून पाणीपुरवठा होतो. मुख्य दरवाजाजवळ दोन हत्तीचे तोंड असलेली शिल्प आहेत.
गडावर पुरातन गुहा असून त्याच्या खांबांवर शिल्प कोरली आहेत. आतमधील दरवाजावरही नक्षीकाम केले आहे.
गुहेत प्रवेश करण्याच्या ठिकाणी दुसºया छोट्या गुहेत मंदिर आहे. गडावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने संवर्धनाचे काम सुरू असून वनविभागाकडूनही रस्ता, पायवाटा करण्यासाठी कामे होत आहेत. दोनपैकी एक लोखंडी व एक पितळी तोफ आहे. गडाच्या बालेकिल्ल्यावर प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच दरवाजा बसविण्यात आला आहे.
>कोथळीगडाच्या पायथ्याशी असणाºया पेठ गावापर्यंत जाण्यासाठी सद्यस्थितीमध्ये कच्चा रोड करण्यात आला आहे. वनविभागाच्या वतीने सकारात्मक कामे सुरू आहेत. हा रोड अजून व्यवस्थित केल्यास पर्यटक मोठ्या प्रमाणात गडाला भेट देऊ शकतील. गडाची माहिती देणारे फलक सर्वत्र लावणे आवश्यक आहे.
- सुशांत शिंदे, शिवप्रेमी, नेरुळ