- नामदेव मोरे, नवी मुंबईस्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा वीर भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या सिद्धगड येथील स्मारकाची ७३ वर्षांपासून उपेक्षा सुरू आहे. स्मारकाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. २ जानेवारीला वर्षातून एकदा अभिवादन करण्यासाठी शासकीय यंत्रणा स्मारकस्थळी हजेरी लावते. यानंतर वर्षभर कोणीही फिरकत नाही. सात दशकांमध्ये स्मारकावर पत्र्याचे शेडही बांधता आले नसून, सिद्धगडावर जाण्यासाठी रस्ता बनविण्यासही शासनास अपयश आले आहे. देशासाठी रक्त सांडणाऱ्या क्रांतिकारकांची उपेक्षा पाहून इतिहासप्रेमी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली असून, हे ठिकाण राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. हुतात्मा वीर भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त २ जानेवारीला मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर पाच हजार इतिहासप्रेमींनी हजेरी लावली. २ जानेवारी १९४३ ला इंग्रजांनी या दोन्ही क्रांतिकारकांवर गोळीबार केला. रेल्वे रूळ उखडून व विजेचे टॉवर कापून इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या या वीरांची समाधी सात दशकांपासून उपेक्षितच राहिली आहे. मुरबाड तालुक्यातील म्हसा गावातून सिद्धगडाकडे जाणारा रस्ता आहे. १३ किलोमीटरच्या रस्त्याचे अद्याप डांबरीकरण झालेले नाही. १९८२ मध्ये या परिसराचा भीमाशंकर अभयारण्यात समावेश करण्यात आला. तेव्हापासून वनविभाग रस्ता बनविण्यासाठी परवानगी देत नाही. रस्ताच नसल्याने स्मारकाकडे जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. सिद्धगडावर ज्या ठिकाणी वीर भाई कोतवाल व त्यांच्या सहकाऱ्यांवर गोळीबार झाला व जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अशा दोन ठिकाणी स्मारकाचा चबुतरा करण्यात आला आहे. गोळीबार झालेले ठिकाण ओढ्यात आहे. पावसाळ्यात येथील धबधब्यावर पर्यटक गर्दी करतात व स्मारकाच्या चौथऱ्यावर मद्यपान करत बसतात. अंत्यसंस्कार झालेले ठिकाण शेतामध्ये आहे. ७३ वर्षांमध्ये येथे चांगले स्मारक उभारता आलेले नाही. आहे त्या स्मारकाच्या चौथऱ्यावर पत्र्याचे शेडही उभारता आलेले नाही. समाधी परिसराचा विकास केलेला नाही. देशासाठी आयुष्याचे बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या समाधी परिसरात साधे पेव्हर ब्लॉकही बसविले नाहीत. आझाद दस्त्याच्या कर्तृत्वाची माहिती देणारा एखादा फलकही येथे बसविण्यात आला नसल्याने इतिहासप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणीवीर भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचे स्मृतिस्थळ राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी समाधीस्थळास भेट देण्यास आलेले इतिहासप्रेमी संजय साळुंखे यांनी व्यक्त केली आहे. समाधीस्थळाचा विकास करण्यात यावा. भाई कोतवाल यांच्या कर्तृत्वाचा आलेख चित्रातून रेखाटण्यात यावा. आझाद दस्त्याने उखडलेले रेल्वे रूळ, कापलेले विजेचे टॉवर व इतर सर्व माहितीपट पर्यटकांना वाचण्यास व पाहावयास मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इतिहासप्रेमींनी केलेल्या मागण्या- सिद्धगड परिसर निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावा.- आझाद दस्त्याच्या कर्तृत्वाची माहिती देणारे संग्रहालय उभारण्यात यावे.- म्हसा गाव ते समाधीस्थळ १३ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करावे.- समाधीस्थळावर सुरक्षा रक्षक नेमून मद्यपार्ट्या करणाऱ्यांवर कारवाई करावी.
कोतवाल स्मारक उपेक्षित
By admin | Published: January 04, 2017 4:41 AM