- वैभव गायकरपनवेल : तब्बल सहा महिन्यांनंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या आॅनलाइन महासभेत कोविड समस्यांचा पाढा नगरसेवकांनी वाचला. कोविडचे प्रश्न महत्त्वाचे आहेच. मात्र, या महासभेत इतर प्रश्न, समस्यांवर मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या नियुक्तीपासूनची ही पहिलीच महासभा होती.कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता, नाट्यगृहात प्रथमच ही आॅनलाइन महासभा पार पडली. आयुक्त, महापौर, उपमहापौर, विषय समित्यांचे सभापती, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते उपस्थित होते. इतर सर्व नगरसेवक आॅनलाइन व्हिडीओ कॉलद्वारे या सभेत सहभागी झाले होते. प्रथमच आॅनलाइन पद्धतीने ही सभा पार पाडत असल्याने, अनेक नगरसेवकांना या सभेत सहभागी होण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे दिसून आले. या सभेत कोविडचे काम पाहणारे उपायुक्त संजय शिंदे यांनी पनवेलमधील कोविड स्थितीचा आढावा सभेत मांडला. राज्यातील पहिल्या पाच कोविडच्या रुग्णांत एक रुग्ण पनवेलमधील असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ११ मार्च रोजी पनवेलमध्ये पहिला रुग्ण सापडला असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. कोविड काळात विविध प्रश्नांसंदर्भात आयुक्त देशमुख यांना एकूण १८ मेल केले होते. मात्र, एकाही प्रश्नाचे उत्तर पालिका प्रशासनाकडून देण्यात आले नसल्याची नाराजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी व्यक्त केली.याबाबत आयुक्त देशमुख यांनी उत्तर देताना पालिका प्रशासन एकही सुट्टी न घेता, अतिशय मोजक्या कर्मचाऱ्यांच्या आधारे कोविडचा लढा देत असल्याने, याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे सांगितले. मात्र, प्रशासन युद्धपातळीवर काम करीत असल्याने नगरसेवकांनी प्रशासनाची बाजी समजून घेतली पाहिजे, असे देशमुख यांनी सांगितले. कोविड रुग्णांच्या व्यतिरिक्त विशेषत: गर्भवती महिलांची कोविड काळात मोठी अडचण होत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुलनेत पनवेल महानगरपालिकेचा मृत्युदर जास्त आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा मृत्युदर अवघा अर्धा टक्का आहे. त्या तुलनेत पनवेल महानगरपालिकेचा मृत्युदर अडीच टक्के असल्याने हा मृत्युदर कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची मागणी नगरसेविका लीना गरड यांनी केली.यावेळी खारघर नोड नो हॉकिंग झोन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तांत्रिक अडचणीमुळे अनेक नगरसेवकांना या सभेत आपले प्रश्न उपस्थित करता आले नाही. मात्र, एकीकडे पालिका प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली जात होती, तर तेच नगरसेवक पालिका प्रशासनाचे अभिनंदन करत असल्याने अनेक नगरसेवकांच्या प्रतिक्रियेत विरोधाभास दिसून येत होता. खासगी रुग्णालयांच्या विरोधातही अनेकांनी आपले मत व्यक्त केले.आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या नियुक्तीपासूनची ही पहिलीच सभा होती. आयुक्त देशमुख यांनी अभ्यासपूर्ण माहिती या सभेत दिली. नगरसेवक हरेश केणी, प्रकाश बिनेदार, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनीही कोविडबाबत प्रश्न उपस्थित केले.या सभेत महापौर निधी ट्रस्ट, अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त निवास, पालिका हद्दीतील १२ शौचालये संस्थांना भाडेतत्त्वावर देण्याबाबत, पालिका कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता देण्याबाबत आदींसह विविध विषयांवर चर्चा यावेळी करण्यात आली.कोविड व्यतिरिक्त इतर प्रश्न दुर्लक्षितसहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या सभेत कोविडबाबतच चर्चा करण्यात आली. पालिका क्षेत्रात इतर समस्या असताना, त्या प्रश्नांकडे नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. अनेकांना आॅनलाइन सभेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने आपले प्रश्न मांडता आले नाहीत.
पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत वाचला कोविड समस्यांचा पाढा, इतर प्रश्न दुर्लक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 1:02 AM