बांधकाम पाडताना पडून मजुराचा मृत्यू, एक जखमी, तुर्भे येथील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 3, 2023 07:25 PM2023-10-03T19:25:12+5:302023-10-03T19:25:35+5:30
जुन्या कंपनीची इमारत पाडताना घडली दुर्घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कंपनीचे बांधकाम पाडताना दोन मजूर दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदार व जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
तुर्भे नाका येथील बागडे कंपनी परिसरातील कांचन (डी ३५०) कंपनीच्या ठिकाणी हि दुर्घटना घडली. सदर कंपनीचे जुने बांधकाम पाडण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवारी दुपारी त्याठिकाणी बांधकाम पाडण्याचे काम सुरु होते. यावेळी दुसऱ्या मजल्यावर काम करणारे दोन मजूर बांधकाम ढासळून खाली पडले. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र अमिनुल रियाजुद्दीन हक (२३) याचा मृत्यू झाला, तर अश्रफउल जैनुल हक (२३) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी कामगारांच्या सुरक्षेत हलगर्जी झाल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार संबंधित ठेकेदार व इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.