पनवेल/कळंबोली : विविध प्रलंबित मागण्यांसाठी सफाई कामगारांनी बुधवार, १२ एप्रिलपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. सलग पाच दिवस कचरा उचलला न गेल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात समाविष्ट असलेल्या सिडको नोडसमधील जवळपास सहा लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पनवेल महापालिका क्षेत्रातीत खारघर, कळंबोली, खांदा वसाहत, कामोठे व कळंबोली या सिडको नोडसचा समावेश करण्यात आला आहे; परंतु हे नोड्स अद्यापि महापालिकेकडे हस्तांतरीत झाले नसल्याने तेथील दैनंदिन कचरा उचलण्याचे काम सिडकोच्या माध्यमातून केले जाते. त्यासाठी सिडकोने २२ कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. या कंत्राटदारांच्या माध्यमातून तब्बल १३00 सफाई कामगार कचरा उचलण्याचे काम करतात. मात्र, आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या मागण्यांसंदर्भात सिडकोकडून अद्यापि कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे हा आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या कोकण श्रमिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कामगारांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा निघत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी दिला आहे. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या संपाचे गंभीर परिणाम शहरात जाणवू लागले आहेत. रस्त्यांवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यातून कमालीची दुर्गंधी येत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या खारघरमधील प्रशस्त रस्त्यांना डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे रहिवाशांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.सोमवारी भाजपाचे कचरा फेको...शहरात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या समस्येवर भाजपाने आक्रमक पावित्रा घेतला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असून यासंदर्भात त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास सोमवारी सिडकोवर कचरा फेको आंदोलन केले जाणार आहे. त्याअनुषंगाने भाजपाच्या वतीने रहिवाशांना आवाहन करण्यात आले आहे.कामगारांच्या प्रश्नावर बैठकीबाबत संभ्रमसफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी सिडकोने बैठक बोलाविल्याची चर्चा आहे. या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र निंबाळकर व संबंधित ठेकेदारांना पाचारण केल्याचे बोलले जात आहे; परंतु आंदोलन करणाऱ्या कोकण श्रमिक संघटनेला या बैठकीपासून दूर ठेवल्याचे सांगितले जाते. असे असले तरी अशाप्रकारची कोणतीही बैठक बोलाविली नसल्याचे सिडकोच्या सूत्रांकडून समजते.
लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: April 17, 2017 4:30 AM