उरण - दररोज सुमारे एक हजार सागरी प्रवाशांची वाहतूक होत असलेल्या मोरा जेट्टीवर प्रवाशांना सोयी-सुविधांचा अभाव जाणवत आहे.मोरा बंदरातून मुंबईकडे जाण्यासाठी जलप्रवास सुखकर असल्याने दररोज सुमारे एक हजार प्रवासी बोटीने ये-जा करतात. मोरा बंदर ते भाऊचा धक्का (मुंबई) जल प्रवासास अवघे ४० ते ५० मिनिटे लागतात. शिवाय जलवाहतुकीचे दरही आवाक्यात असल्याने दररोज अनेक प्रवासी जलप्रवासाला प्राधान्य देतात. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड प्रवाशांंच्या सुविधांंकडे दुर्लक्ष करीत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.मोरा बंदर विविध समस्यांंनी ग्रासले आहे. मोरा बंदरावर विजेचे खांब बसवण्यात आले असले तरी अनेक दिवे बंद आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली तरी नळाला पाणीच येत नाही, तर काही नळ गायब झाले आहेत. या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात आले असले तरी ते गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. याबाबत मोरा जेट्टी परिसरात सोयी-सुविधांबाबत प्रवाशांनी लोकप्रतिनिधी व मेरीटाइम बोर्डाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप त्याकडे दुर्लक्ष होत आहे.मोरा जेट्टीवरील स्वच्छतागृह पाणीपुरवठ्याअभावी बंद ठेवण्यात येत आहे. नगरपरिषद प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छतेबरोबरच अन्य सुविधांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.- पी. बी. पवार,निरीक्षक, मोराबंदर
मोरा जेट्टीवर सोयी-सुविधांचा अभाव, जलवाहतूक करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 2:44 AM