नवी मुंबई महानगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुविधांची वानवा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 12:39 AM2020-09-03T00:39:47+5:302020-09-03T00:40:37+5:30
महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलात दररोज हजारोंच्या संख्येने ग्राहकांची ये-जा असते. मात्र, येथे अस्वच्छता व सुविधा नसल्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका उद्भवू शकतो.
- मयुर तांबडे
नवीन पनवेल : करोडो रुपये खर्च करून बांधलेले पनवेल येथील व्यापारी संकुल अनेक समस्यांनी ग्रासले आहे. कित्येक वेळा पालिकेत लेखी तक्रारी करूनही पालिका लक्ष देत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलात दररोज हजारोंच्या संख्येने ग्राहकांची ये-जा असते. मात्र, येथे अस्वच्छता व सुविधा नसल्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका उद्भवू शकतो. अनेकांचे गाळे लिकेज झाले आहेत, त्यामुळे स्लॅबवरून पाणी गाळ्याच्या आतमध्ये पडत आहे. फर्निचर, टेबल यांचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारींत वाढ होत आहे. काही गाळेधारकांनी स्लॅबवर प्लॅस्टीकचे आवरण टाकले आहे. त्यामुळे तात्पुरता गळतीपासून त्यांना आराम मिळाला आहे.
व्यापारी संकुलातील अनेक बाथरूमचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत, तर काही बाथरूममध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. टेरेसवरील डेब्रिजही संकुलात टाकून देण्यात आलेले आहे. गटारावरील झाकणे तुटलेल्या अवस्थेत आहेत. व्यापारी संकुलात येणारी दोन्ही रस्ते मच्छीविक्रेते आणि हार बनविणाऱ्यांनी अडवले आहेत. संकुलातील काही ठिकाणचे स्लॅब खाली कोसळले आहे. टेरेसजवळील खोलीला टाकण्यात आलेले पत्रे फुटल्याने त्यातून संपूर्ण पायºयांवर पावसाळ्यात खाली पाणी येत आहे. पावसाचे पाणी जिन्याच्या पायºयांवरून थेट खाली येत आहे. त्यामुळे या पायºयांवरून चालताना नागरिकांचे पाय घसरून ते खाली पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पुरुष आणि महिलांच्या बाथरूमची अवस्था दयनीय झालेली आहे. दरवाजे तुटलेले असून, खिडक्याही नाहीत. बाथरूममधील फ्लश टँकही तुटलेले आहे. मीटर रूमही उघडे ठेवण्यात आले आहे. इमारतीच्या कॉलमला तडे गेलेले आहेत. बहुतांशी ठिकाणच्या ट्यूब लाइट बंद अवस्थेत असल्याने, रात्रीच्या वेळेस अंधार पसरत असल्याचे येथील गाळेधारकांचे म्हणणे आहे.
संकुलातील विजेच्या केबल उघड्या स्थितीत आहेत. त्यामुळे येथे येणाºया-जाणाºया नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. लिफ्टसाठी ठेवण्यात आलेल्या जागेत प्लॅस्टीकच्या बाटल्यांचा ढीग साचलेला आहे. लिफ्टची वरील भिंतही फुटलेल्या अवस्थेत आहे. सुरक्षारक्षक नसल्याने व्यापारी संकुलात भिकारी, हार विक्री करणारे यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. टेरेसवरील पाण्याच्या टाक्या तुटलेल्या आहेत. त्यावर झाकणेही नसल्याने त्यात पक्षीही मरून पडत असल्याचे येथील गाळेधारकांनी सांगितले. कॉम्प्लेक्सला वर पत्रे टाकले नसल्याने पूर्ण कॉम्प्लेक्सला गळती लगलेली आहे. टेरेसवर कॉलमसाठी काढण्यात आलेले लोखंडी स्टील उघड्या स्थितीत असल्याने त्यातून पाणी खाली लिकेज होत आहे.