नवी मुंबई : कचराकुंडीमुक्त नवी मुंबई शहर करण्याच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्यावतीने शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या कचराकुंड्या मोठ्या प्रमाणावर हटविण्यात आल्या आहेत. परंतु या कचराकुंड्या हटविल्या ठिकाणी खुल्या जागेवर कचरा टाकला जात आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटत असून नागरिकांना विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे.घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशात सर्वोत्तम शहर म्हणून नवी मुंबई शहराला बहुमान मिळाला आहे. शहरात वाढत्या कचराकुंड्या आणि इतरत्र पडणारा कचरा तसेच कचऱ्याचे वर्गीकरण होऊन कचºयाची योग्य विल्हेवाट लावता यावी यासाठी कचराकुंडीमुक्त शहर ही संकल्पना राबविण्यात येत आहे. बेलापूर ते दिघा ठिकाणच्या झोपडपट्टी, गाव गावठाण, सिडकोनिर्मित सोसायट्या, रेल्वे स्थानक, भाजी, फळे मंडई आदी सार्वजनिक भागात २0१५ साली १0७0 लोखंडी कचराकुंड्या पालिकेच्या वतीने ठेवण्यात आल्या होत्या.कचराकुंडीमुक्त शहर करण्याच्या अनुषंगाने अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणच्या तसेच गावगावठाण आणि झोपडपट्टी भागातील कचराकुंड्या हटविल्यानंतरही त्या जागेवर कचरा टाकला असल्याने यावर उपाय म्हणून स्वच्छता विभागाकडून मागील काळात कचरा कुंड्या हटविलेला परिसर स्वच्छ करून विविध फुलझाडांच्या कुंड्या तर काही ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाक बसविण्यात आले होते त्यामुळे नागरिकांनी देखील यामधील काही ठिकाणी कचरा टाकणे बंद केले होते. परंतु आणखी कचरा कुंड्या कमी करण्यात आल्यावर कचरा कुंड्या हटविलेल्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकलेला कचरा पावसामुळे भिजून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेच्या माध्यमातून कचरा जमा करण्यासाठी उपाययोजना करून देखील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.>मागील काही दिवसात कचरा उचलण्यासंदर्भात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. गाव गावठाण आणि झोपडपट्टी भागात कचरा उचलण्यासाठी जास्त वेळा गाड्या पाठविल्या जात आहेत. कचरा गोळा करण्यासाठी विविध उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. यापुढे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.- तुषार पवार,उपायुक्त घनकचरा विभाग
कचराकुंडीमुक्त संकल्पनेला खो, पालिकेचे कारवाईचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:53 PM