नवी मुंबईत आरोग्य रामभरोसे, व्हेंटिलेटर्ससह आयसीयूची कमतरता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 12:43 AM2020-09-16T00:43:02+5:302020-09-16T00:43:39+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेडचे रुग्णालय सुरू केले आहे. राधास्वामी सत्संग भवनमध्ये ४०८ बेड व एपीएमसीच्या निर्यात भवनमध्ये ५०३ बेड उपलब्ध केले आहेत.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : शहरात सर्वसामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी बेडची मुबलक उपलब्धता आहे, परंतु प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांसाठी आयसीयू युनिट व व्हेंटिलेटर्स उपलब्ध होत नाहीत. सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध होत नसून, गरीब व श्रीमंत सर्वांचेच आरोग्य रामभरोसे सुरू आहे. गंभीर प्रकृती झालेल्यांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेडचे रुग्णालय सुरू केले आहे. राधास्वामी सत्संग भवनमध्ये ४०८ बेड व एपीएमसीच्या निर्यात भवनमध्ये ५०३ बेड उपलब्ध केले आहेत. मनपा व खासगी रुग्णालयामध्ये तब्बल ५,८७४ बेडची उपलब्धता असून, त्यापैकी ३,२२२ बेडचा वापर सुरू आहे. तब्बल २,६५२ बेड शिल्लक असल्याचा दावा महानगरपालिका प्रशासन करत आहे, परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे.
कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त बेडची निर्मिती केली आहे, परंतु ज्यांची प्रकृती गंभीर झाली आहे व ज्यांना आयसीयू व व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे, अशा रुग्णांसाठी बेडची कमतरता निर्माण होत आहे.
मनपाने धूळफेक थांबवावी
नवी मुंबई पालिकेने शहरात ५,८७४ बेडची व्यवस्था केलेली असून, सद्यस्थितीमध्ये २,६५२ बेड शिल्लक असल्याची माहिती संकेतस्थळावर दिली आहे, परंतु प्रत्यक्षात सर्वसामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी पुरेसे बेड आहेत. ज्या रुग्णांना दहा लीटरपेक्षा जास्त आॅक्सिजन लागतो, अशा रुग्णांना आयसीयू व व्हेंटिलेटर्स असलेल्या रुग्णालयात घेऊन जा, असे सांगितले आहे. मनपाच्या व प्रमुख खासगी रुग्णालयातही हे बेड उपलब्ध होत नाहीत. यामुळे सर्वसामान्यांनी जायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित होते. मनपाने धूळफेक थांबवून व्हेंटिलेटर्स, आयसीयू युनिट वाढविण्याची मागणी होत आहे.
बेडच शिल्लक नसल्याने गैरसोय
मनपाच्या वाशीतील डेडिकेटेड कोविड रुग्णालयात सर्व बेड हाऊसफुल झाले आहेत. नवी मुंबईमधील सर्व प्रमुख खासगी रुग्णालयांमध्येही आयसीयू व व्हेंटिलेटर्स युनिट शिल्लक नाहीत. सर्व रुग्णालयांमध्ये फक्त ३३६ आयसीयू युनिट असून, त्यामधील फक्त १० शिल्लक असून, प्रमुख रुग्णालयांमध्ये एकही बेड उपलब्ध नाही. शहरात सद्यस्थितीमध्ये १२१ व्हेंटिलेटर्स आहेत. त्यापैकी फक्त ३ व्हेंटिलेटर्स शिल्लक आहेत.
रुग्णालयनिहाय बेड व शिल्लक व्हेंटिलेटर्स, आयसीयूचा आजचा तपशील
रूग्णालय एकूण बेड वापर शिल्लक बेड आयसीयू व्हेंटिलेटर्स
मनपा वाशी रूग्णालय १७५ १७५ ० ० ०
तेरणा, नेरूळ १०० ९८ २ ० ०
फोर्टीस, वाशी ८५ ८५ ० ० ०
रिलायन्स, कोपरखैरणे १०० १०० ० ० ०
एमजीएम, सीबीडी ४० ३१ ९ ५ ०
एमपीसीटी, सानपाडा ८३ ८३ ० ० ०
अपोलो, सीबीडी १३६ १३६ ० ० ०
पीकेसी रूग्णालय ४७ ३८ ९ ० ०
न्यूरोजन नेरूळ ७५ ७४ १ ० ०
इंद्रावती ऐरोली ४० ४० ० ० ०
सनशाइन नेरूळ ४० २८ १२ ० ०
डी. वाय. पाटील ३०० २४१ ५९ ० ०
सिडको प्रदर्शन केंद्र ५१३ १४५ ३६८ ० ०
हेरिटेज ऐरोली १० १० ० ० ०
न्यू मिलेनियम २० २१ ० ० २
न्यू मानक ४३ १७ २६ ५ ०
लक्ष्मी, घणसोली १५ १५ ० ० ०
फ्रिझन, घणसोली १९ १९ ० ० ०
व्हिनस रूग्णालय १२ ४ ८ ० ०
निर्मल मल्टीस्पेशालीटी १३ ९ ४ ० ०
राजपाल, कोपरखैरणे २० २० ० ० ०
सिद्धिका, कोपखैरणे ५ ५ ० ० २
एमजीएम, वाशी २० २१ ० ० ०
एमजीएम, सानपाडा ७५ ६३ १२ ० ०
एपीएमसी निर्यातभवन ५०३ १४९ ३५४ ० ०
राधास्वामी सत्संग भवन ४०८ १६८ २४० ० ०