तरुणांच्या देशात कुशल मनुष्यबळाची कमतरता; राज्यपाल रमेश बैस यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 06:22 AM2023-03-28T06:22:45+5:302023-03-28T06:23:03+5:30

पनवेलमध्ये कौशल्य विद्यापीठाच्या वास्तूचे भूमिपूजन

lack of skilled manpower in the country of youth; Maharashtra Governor Ramesh Bais regrets | तरुणांच्या देशात कुशल मनुष्यबळाची कमतरता; राज्यपाल रमेश बैस यांची खंत

तरुणांच्या देशात कुशल मनुष्यबळाची कमतरता; राज्यपाल रमेश बैस यांची खंत

googlenewsNext

पनवेल : भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त तरुण लोकसंख्या आहे. तरीही भारतीय उद्योजक कुशल मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेचा सामना करीत आहेत. श्रम ब्युरोच्या २०१४ च्या अहवालानुसार रोजगार क्षमतेसाठी आवश्यक कौशल्याच्या अभावामुळे भारतातील  कुशल कर्मचाऱ्यांचे प्रमाण केवळ २ टक्के आहे. शिवाय पारंपरिक शिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगार देण्याचेही आव्हान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी सोमवारी पनवेल येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूच्या भूमिपूजनप्रसंगी केले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व नावीन्यपूर्ण उपक्रममंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी,  रवींद्र पाटील, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा,  कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे उपस्थित होते.राज्यपाल बैस म्हणाले की, भारतीय शिक्षण प्रणाली तल्लख बुद्धी असलेली पिढी निर्माण करीत आहे; परंतु त्यात विशिष्ट नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्यांचा अभाव आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, प्रशिक्षित मानव संसाधन ही आवश्यक बाब आहे. याकरिता कौशल्य विकास विभागाची जबाबदारी खूप मोठी आहे. महाराष्ट्र हे आयटीआय आणि उद्योगांची सांगड घालणारे पहिले राज्य आहे. पुढच्या काळात उद्योग व रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. लवकरच नवी मुंबईत स्टार्टअप हबसुद्धा सुरू करणार असून, कौशल्य विद्यापीठ, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवश्यक सोयी-सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. पालकमंत्री उदय सामंत यांनी कौशल्य विकास आणि उद्योग यांची योग्य प्रकारे सांगड घातल्यास महाराष्ट्रासह देशाचेही भवितव्य निश्चितच उज्ज्वल असेल, असा विश्वास व्यक्त केला.

आयटीआयच्या १० एकर जागेची निवड

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासाठी पनवेलची निवड करण्यात आली. आयटीआयच्या १० एकर जागेची निवड केल्यामुळे वर्षानुवर्षे धोकादायक इमारतीतील आयटीआयलादेखील नवी वास्तू मिळणार आहे. पनवेल संघर्ष समितीचे कांतीलाल कडू यांनी आयटीआयच्या नव्या इमारतीसाठी पाठपुरावा केला आहे.

Web Title: lack of skilled manpower in the country of youth; Maharashtra Governor Ramesh Bais regrets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.