चाचणी सेंटरअभावी फरफट वाढली; प्रवासात संसर्ग पसरण्याचा धोका वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 12:33 AM2021-04-04T00:33:47+5:302021-04-04T00:34:06+5:30
गतवर्षीच्या तुलनेत मागील दोन महिन्यात नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे.
नवी मुंबई : शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. परंतु विभागनिहाय पुरेसे चाचणी सेंटर नसल्याने रुग्णांना एका विभागातून दुसऱ्या विभागात धाव घ्यावी लागत आहे. याचाच फायदा घेऊन खासगी लॅब व रुग्णालयांकडून भरमसाठ शुल्क आकारून चाचण्या केल्या जात आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत मागील दोन महिन्यात नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. सध्या प्रतिदिन एक हजारच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या लक्षणांशी मिळते-जुळते त्रास असलेल्या व्यक्ती पालिकेच्या चाचणी केंद्रांकडे धाव घेत आहेत. परंतु सर्वच ठिकाणी दुपारपर्यंतच चाचणी केंद्र चालवले जात आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीला संध्याकाळी अथवा रात्री त्रास होऊ लागल्यास चाचणी करायची कुठे? असा प्रश्न उद्भवत आहे. याचाच फायदा घेऊन खासगी लॅब व रुग्णालयांकडून जादा शुल्क आकारून कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. हा खर्च एकाच कुटुंबात जास्त व्यक्ती असलेल्या मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेरचा आहे. यामुळे त्यांना पालिकेच्या चाचणी केंद्राच्या शोधात एका विभागातून दुसऱ्या विभागात धाव घ्यावी लागत आहे. यादरम्यान त्यांच्याकडून रिक्षा अथवा बसने प्रवास झाल्यास या प्रवासात इतरांनाही संसर्ग पसरत आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागात पूर्णवेळ चाचणी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही विभागनिहाय पूर्णवेळ चाचणी केंद्र सुरू न करता कोरोनाचा संसर्ग वाढीला प्रशासनच हातभार लावत असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांनी केली आहे.