लेडीज बार, पबवर पहाटे तीनपर्यंत धडक कारवाई; पुण्यानंतर नवी मुंबई महापालिकेचा दणका 

By नामदेव मोरे | Published: May 29, 2024 07:31 PM2024-05-29T19:31:15+5:302024-05-29T19:31:37+5:30

सहा बारसह पबचे अतिक्रमण हटविले.

Ladies bar, pub strike till 3 am A bump in Navi Mumbai Municipal Corporation after Pune  | लेडीज बार, पबवर पहाटे तीनपर्यंत धडक कारवाई; पुण्यानंतर नवी मुंबई महापालिकेचा दणका 

लेडीज बार, पबवर पहाटे तीनपर्यंत धडक कारवाई; पुण्यानंतर नवी मुंबई महापालिकेचा दणका 

नवी मुंबई : 'बाळा'ने केलेल्या अपघातानंतर जाग आलेल्या पुणे महापालिकेने आपल्या हद्दीतील अनधिकृत पब, बारविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. यातून शहाणे होऊन नवी मुंबई महापालिकेनेही आपल्या शहरातील लेडीज बार, पब, ढाबे, चायनीज सेंटरविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. यानुसार बुधवारी मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी पहाटे तीन वाजेपर्यंत ६ पब व बार, एका ढाब्यासयह तीन चायनीज सेंटरची अतिक्रमणे हटविली. महानगरपालिकेच्या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.

शहरात अनेक ठिकाणी लेडीज बार, पब व इतर हॉटेलचालकांनी सार्वजनिक वापरासाठी असलेल्या जागेत अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला आहे. पावसाळी शेडच्या नावाखाली हॉटेलसमोर व बाजूला शेड तयार करून तेथेही व्यवसाय केला जात आहे. ढाबे, चायनीज सेंटर चालकांनी मूळ दुकानांपेक्षा दुप्पट जागेत अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले होते. या सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही स्वत:हून अतिक्रमण न हटविणारांविरोधात मंगळवारी रात्री दहा वाजतापासून बुधवारी पहाटे तीन वाजेपर्यंत बेलापूर व तुर्भे विभागात मोहीम राबविली.बेलापूरमधील हॉटेल स्टार नाईट, हॉटेल स्वीकेन्स, मेघराज व साई ढाबा तर तुर्भे विभागातील टी व्हीला कॅफे, टेस्ट ऑफ पंजाब, येलो बनाना फूड यांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख रुपये दंड वसूल केला.

शहरातील सर्व हॉटेल व पबचालकांच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असून, यामध्ये तुर्भेचे विभाग अधिकारी भरत धांडे, बेलापूरचे विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अजय गडदे, डॉ. अमोल पालवे, सागर मोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
 
बेलापूर व तुर्भे विभागात अतिक्रमण करणाऱ्या हॉटेल व बार चालकांवर कारवाई केली आहे. शहरातील अतिक्रमण करणाऱ्या इतर हॉटेलचालकांनाही नोटिसा दिल्या असून, नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. - डॉ. राहुल गेठे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग
 
अतिक्रमण विभागाने कारवाई केलेल्या हॉटेलचा तपशील
बेलापूर
हॉटेल स्टार नाईट
हॉटेल स्वीकेन्स
हॉटेल मेघराज
साई ढाबा
तुर्भे विभाग
टी व्हीला कॅफे
टेस्ट ऑफ पंजाब
येलो बनाना फूड प्रा. लि.
 
अंतर्गत अतिक्रमणांवरही होणार कारवाई
महानगरपालिका प्रशासनाने हॉटेलचालकांनी मार्जिनल स्पेसमध्ये केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. अनेक हाॅटेलचालकांनी महानगरपालिकेची परवानगी न घेता हाॅटेल व बारमधील अंतर्गत बांधकामामध्ये बदल केले आहेत. काही ठिकाणी पोटमाळेही तयार केले आहेत. अशा सर्व अतिक्रमणांवरही कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Ladies bar, pub strike till 3 am A bump in Navi Mumbai Municipal Corporation after Pune 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.