नवी मुंबई : कोपर खैरणे येथील बालाजी थिएटर परिसरातील अनधिकृत झोपड्यांवर बुधवारी पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याठिकाणी शोधमोहीम राबवली असता ठिकठिकाणी लपवून ठेवलेला सुमारे 15 किलो गांजा आढळून आला. गटारांमध्ये, गठुळ्यात तसेच भंगार वाहनांमध्ये हा गांजा साठवण्यात आला होता. मोकळ्या जागेत, पदपथांवर राहणाऱ्यांवर पालिकेकडून ठोस कारवाई होत नसल्याने त्यांना अभय मिळत गेल्याने त्यांच्याकडून अमली पदार्थांची विक्री सुरु होती.
कोपर खैरणे परिसरात चालणाऱ्या अमली पदार्थ विक्री विरोधात पोलिसांनी हातघड्या सोडल्या आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे चालणाऱ्या ड्रॅग विक्रीच्या अड्ड्यांवर छापे टाकून कारवाया केल्या जात आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी बालाजी थिएटर परिसरातील झोपडपट्टीत विक्रीसाठी आणलेला 50 किलो गांजा पकडला होता. यावरून त्याठिकाणी अद्यापही गांजासह इतर अमली पदार्थ विक्री चालत असल्याचे समोर आले होते. मात्र पालिकेच्या उदासीनतेमुळे झोपड्यांना अभय मिळत असल्याने व पोलिसांच्याच चुकीच्या धोरणामुळे तिथले अमली पदार्थ विक्रीचे अड्डे बंद होऊ शकले नव्हते. तिथल्या सिडकोच्या भूखंडावरील झोपड्या हटवताना झालेल्या विरोधात झोपड्या पेटवणे, दगडफेक करणे असे प्रकार घडले होते. त्यानंतरही तीनदा कारवाई झाल्यानंतर मैदानातून हटवलेल्या झोपडपट्टीधारकांनी तिथल्याच पदपथावर संसार थाटला होता. तसेच उघडपणे अमली पदार्थ विक्री देखील चालवली होती. यामुळे परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता. तर शहरात सर्वत्र स्वच्छता अभियान राबवले जात असताना सदर ठिकाणी मात्र गलिच्छ दृश्य नजरेस पडत होते.
अखेर सदर ठिकाणी बेघरांना मिळणाऱ्या आश्रयामुळे तिथे चालणाऱ्या ड्रग्स विक्रीबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी महापालिकेला कळवले होते. त्यानुसार अतिक्रमण विरोधी पथकाच्या मदतीने बुधवारी त्याठिकाणी कारवाई केली. यावेळी वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील, रेल्वेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी कटारे, विभाग अधिकारी प्रबोधन मावडे यांच्या नियंत्रणाखाली तिथे कारवाईचा दणका देण्यात आला. यादरम्यान कारवाईला विरोध करणाऱ्याना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर कारवाईत हाती लागलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गठुळे, गटारे, गाड्यांमध्ये गांजा
मंगळवारी दुपारी त्याठिकाणी एका महिलेकडून सुमारे अर्धा किलो गांजा जप्त केला होता. त्यामुळे बुधवारी झोपड्या हटवताना देखील गांजा मिळून येण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांकडून प्रत्येक बारकाईने झाडाझडती घेतली जात होती. त्यामध्ये गठुळ्यांमध्ये तसेच गटारांमध्ये लपवलेला सुमारे 15 किलो गांजा मिळून आला. यावरून संपूर्ण परिसरात चालणारे गांजा विक्रीचे अड्डे नष्ट झाले आहेत.
स्थानकाबाहेरील परिसराला गलिच्छ स्वरूप.
रेल्वे स्थानकाबाहेरील प्रवास्यांच्या वापराच्या जागेत पार्किंगचा ठेका देण्यात आला आहे. यामुळे त्याठिकाणी भंगार गाड्यांचा खच लागला असून त्यातही गांजा लपवण्यात आला होता. तर जागोजागी मांडलेल्या चुली, साचलेला कचऱ्याचा ढीग यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले असतानाही सिडको, महापालिका यांच्याकडून परिसर स्वच्छतेचे कष्ट घेण्यात आले नाही.