पावसामुळे लाल मिर्ची भडकली, बाजारसमितीमध्ये भाववाढ; मसाल्यांचेही दर वाढल्याने खर्च वाढला
By नामदेव मोरे | Published: March 27, 2023 06:35 PM2023-03-27T18:35:07+5:302023-03-27T18:35:18+5:30
देशभर झालेल्या अवकाळी पावसामुळे मिर्चीच्या उत्पादनावरही परिणाम झाला असून बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे.
नवी मुंबई : देशभर झालेल्या अवकाळी पावसामुळे मिर्चीच्या उत्पादनावरही परिणाम झाला असून बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये लाल मिर्ची २०० ते ८५० रुपयापर्यंत पोहचले आहेत. मसाल्यांचे दरही वाढल्यामुळे यावर्षी मिर्ची पावडर तयार करण्याचा खर्चही वाढणार आहे.
मुंबई, नवी मुंबई परिसरातील नागरिक मार्च ते मे महिन्यामध्ये पुढील वर्षभर पुरेल एवढी मिर्ची पावडर तयार करून ठेवत असतात. वर्षभराच्या चटणीची सोय या महिन्यात केली जाते. बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात सरासरी १०० ते १२५ टन मिर्चीची आवक होत होती. मिर्चीचे दरही स्थिर होते. परंतु पावसामुळे आंध्रप्रदेश, कर्नाटकमधील मिर्ची उत्पादनावरही परिणाम झाला असून त्यामुळे भाव वाढण्यास सुरूवात झाली आहे.
सर्वच मिर्चीचे दर ३० ते ५० रुपयांनी वाढले आहेत. मिर्चीचा हंगाम १५ एप्रीलपर्यंत चालणार आहे. त्यानंतर चांगल्या दर्जाच्या मिर्चीची आवक कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांनी आत्ताच मिर्ची खरेदी करावी असे आवाहन व्यापाऱ्यांनीही केले आहे.
सद्यस्थितीमध्ये बाजार समितीमध्ये बेडगी, कश्मीरी, तेजा, पांडी, रेशमपट्टी व इतर प्रकारच्या मिर्चीची आवक सुरू आहे. आंध्रप्रदेशमधील गुंठूर , कर्नाटकमधील हुबळी, तेलंगनमधील वरंगळ परिसरातून मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. यावर्षी तीळ, जिरे, लवंग व इतर मसाल्याच्या पदार्थांच्या दरामध्येही वाढ झाली असल्यामुहे ग्राहकांना मिर्ची पावडर तयार करण्यासाठी जादा खर्च करावा लागणार आहे.
प्रतिक्रिया
मार्केटमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर ठिकाणावरून मिर्चीची आवक होत आहे. पावसाचा फटका बसल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. १५ एप्रिल पर्यंत आवक भरपूर राहणार आहे.
अमरीश बरोत, मिर्ची व्यापारी
बाजार समितीमधील मिर्ची व मसाल्यांचे दर
वस्तू - बाजारभाव
बेडगी मिर्ची - ३५० ते ४५०
कश्मीरी - २०० ते ८५०
तेजा - २५० ते २८०
पांडी २५० ते २८०
रेशमपट्टी ७०० ते ८५०
तीळ १६० ते २६०
जिरे २४० ते ३८०
लवंग ८५० ते १०००
दालचीनी १५० ते २००