नवी मुंबईत वर्षभरात २५.७८ कोटींचा मुद्देमाल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 12:35 AM2021-01-15T00:35:28+5:302021-01-15T00:35:50+5:30

६ कोटी ८६ लाखांचा माल जप्त

Lampas worth Rs 25.78 crore in Navi Mumbai during the year | नवी मुंबईत वर्षभरात २५.७८ कोटींचा मुद्देमाल लंपास

नवी मुंबईत वर्षभरात २५.७८ कोटींचा मुद्देमाल लंपास

Next

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून वर्षभरात २५ कोटी ७८ लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यापैकी ६ कोटी ८६ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित १९ कोटींचा ऐवज चोरट्यांनी हडप केल्याने तो पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षात वेगवेगळ्या स्वरूपाचे एकूण ४ हजार ३३१ गुन्हे घडले आहेत. त्यापैकी १ हजार ७८२ गुन्हे मालमत्तेशी संबंधित आहेत. पनवेल व उरण परिसरात घरफोडी, चोरी, सोनसाखळी चोरी व वाहन चोरी अशा मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांत सातत्याने वाढ होत आहे.

वर्षभरात घरफोडीच्या ३०१ घटना घडल्या आहेत. त्यापैकी २६५ घरफोडी रात्री झालेल्या असून त्यामध्ये तब्बल ४ कोटी ९० लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लुटला आहे. पोलिसांनी घडलेल्या एकूण गुन्ह्यांच्या तपासादरम्यान ७१४ गुन्ह्यांची उकल शिताफीने केली आहे. मात्र गुन्हेगारांना अटक करूनही त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना फारसे यश आले नाही. त्यामुळे २५.७८ कोटींच्या ऐवजापैकी केवळ ६ कोटी ८६ लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस जप्त करू शकले आहेत. त्यात चोरीला गेलेल्या ७८० पैकी २६० वाहनांचा समावेश आहे. उर्वरित ऐवज हा रोख रक्कम व दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपातील आहे. 

सन २०१९ मध्ये मालमत्तेचे २ हजार २६० गुन्हे घडले होते. त्यामध्ये एकूण २८.९२ कोटींचा ऐवज चोरीला गेला होता. त्यापैकी ८६१ गुन्ह्यांची उकल करून ९ कोटी २२ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला होता. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांची संख्या घटली आहे. परंतु चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याचे प्रमाण घटल्याने तब्बल १८ कोटी ९२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलेले नाही.

लॉकडाऊनमध्ये घट
तीन महिने पूर्णपणे लॉकडाऊनमध्येच गेल्याने या कालावधीत गुन्ह्यांची संख्या काही प्रमाणात घटली होती. मात्र अनलॉक होताच पुन्हा गुन्ह्यांचा आलेख वाढला आहे. त्यानुसार गतवर्षात मालमत्तेशी संबंधित एकूण १ हजार ७८२ गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये दरोडा, सोनसाखळी चोरी, घरफोडी व वाहन चोरी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. या गुन्ह्यांमध्ये एकूण २५ कोटी ७८ लाख ९५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. 

 

Web Title: Lampas worth Rs 25.78 crore in Navi Mumbai during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.