ऐरोली उन्नत मार्गाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला, सिडकोचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 06:15 AM2021-02-18T06:15:50+5:302021-02-18T06:16:07+5:30

CIDCO's initiative : कळवा-ऐरोली उन्नत रेल्वेमार्गाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली. परंतु विविध कारणांमुळे रखडपट्टी झाल्याने प्रकल्पाचा खर्च ४२८ कोटींवरून ५१९ कोटींपर्यंत वाढला आहे.

Land acquisition of Airoli elevated road has been successful, CIDCO's initiative | ऐरोली उन्नत मार्गाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला, सिडकोचा पुढाकार

ऐरोली उन्नत मार्गाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला, सिडकोचा पुढाकार

Next

नवी मुंबई : कल्याण व भिवंडी क्षेत्रातील लाखो प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या कळवा-ऐरोली दुहेरी उन्नत रेल्वेमार्गाचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. परंतु सिडकोने यात सकारात्मक पुढाकार घेतला आहे. त्यानुसार दिघा येथील ९१९ चौ.मी क्षेत्रफळाची जागा मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशनला अर्थात एमआरव्हीसीला देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
कळवा-ऐरोली उन्नत रेल्वेमार्गाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली. परंतु विविध कारणांमुळे रखडपट्टी झाल्याने प्रकल्पाचा खर्च ४२८ कोटींवरून ५१९ कोटींपर्यंत वाढला आहे. लाखो रेल्वे प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या या मार्गासाठी भूसंपादन कळीचा मुद्दा ठरला आहे. सिडकोकडून अपेक्षित जमीन हस्तांतरित न झाल्याने हा प्रकल्प रखडल्याची बाब खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेच्या संसदीय अधिवेशनात निदर्शनास आणून दिली. यासंदर्भातील वृत्त प्रसिध्द होताच सिडकोने तातडीने कार्यवाही करीत दिघा येथील ९१९ चौ.मी. क्षेत्रफळाची जागा एमआरव्हीसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्नत मार्गासाठी वर्ग करण्यात येणाऱ्या दिघा येथील जमिनीचा कोणताही आराखडा सिडकोने तयार केलेला नाही. त्यामुळे सदर जमिनीचा समावेश नॉन नोडल क्षेत्रात करण्यात आला आहे. या जमिनीचा बहुतांश भाग प्रादेशिक उद्यान क्षेत्र आणि काही भाग निवासी क्षेत्रात मोडतो. त्यामुळे सदरची ९१९ चौ.मी. क्षेत्रफळाची जमीन ऐरोली उन्नत मार्गासाठी ९० वर्षांच्या भाडेकरारावर एमआरव्हीसीला देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी प्रति चौरस मीटर २२,५०० रुपये दराने २ कोटी ६ लाख ७७ हजार पाचशे रुपये इतके मूल्य सिडकोने निश्चित केले आहे. 
विशेष म्हणजे ३१ मार्च २०२१ पूर्वी एमआरव्हीसीकडून भाडेकराराची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास नियमानुसार सुधारित दर लागू केले जातील, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांना नवी मुंबईत येण्यासाठी ठाणे रेल्वेस्थानकाचा फेरा मारावा लागतो. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कसारा ते कल्याण आणि वांगणी ते कल्याणपर्यंतच्या लाखो प्रवाशांना नवी मुंबईत जाण्यासाठी ठाण्यात जाऊन लोकल बदलावी लागते. त्यामुळे ठाणे स्थानकावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी २०१५ मध्ये कळवा-ऐरोली उन्नत मार्गाची घोषणा करण्यात आली होती. परंतु प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनी संपादित न झाल्याने हा प्रकल्प रखडला आहे. विशेषत: सिडकोकडून अपेक्षित जमीन एमआरव्हीसीकडे वर्ग न झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. परंतु सिडकोने आता हा तिढासुध्दा सोडविला आहे.

सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांना सिडकोचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. ऐरोली उन्नत मार्गामुळे ठाणे रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांचा ताण कमी होणार आहे. तसेच ठाणे, कल्याण आणि भिवंडी या परिसरातून नवी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
- डॉ. संजय मुखर्जी, 
व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Web Title: Land acquisition of Airoli elevated road has been successful, CIDCO's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.