लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा व्यावसायिक वापरासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत खुला करण्याचे सिडकोचे नियोजन आहे. सध्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. यातील धावपट्टी क्रमांक २६/०८ साठी १२ आणि १३ ऑगस्ट रोजी विमानतळ प्राधिकरणाच्या सहाय्याने इन्स्टुमेंट लँडिंग सिस्टिम चाचणी पूर्ण केली. विमानतळाच्या परिचालनासाठी अंतिम परवान्याच्या दृष्टीने ही चाचणी महत्त्वाची मानली जाते. तिच्या अंतिम अहवालानंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रत्यक्ष विमानाचे लँडिंग केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
इन्स्टुमेंट लँडिंग सिस्टिम (आयएलएस) चाचणी ही प्रतिकूल हवामान परिस्थितीतही विमानाचे लँडिंग होण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. ज्या स्थानावरून विमान धावपट्टीवर उतरविले जाईल त्या स्थानाची आयएलएस चाचणी केली जाते. गेल्या महिन्यात आयएलएस चाचणी केली परंतु, खराब हवामानामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे १२, १३ ऑगस्ट रोजी पुन्हा चाचणी घेतली.