कर्जत टेकडीला भूस्खलनाचा धोका!
By admin | Published: May 23, 2017 02:11 AM2017-05-23T02:11:11+5:302017-05-23T02:11:11+5:30
अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन माळीणसारखे गाव अक्षरश: मातीखाली गाडले गेले आहे. यावेळी वित्तहानीबरोबरच मोठी जीवित हानी झाली होती.
कांता हाबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन माळीणसारखे गाव अक्षरश: मातीखाली गाडले गेले आहे. यावेळी वित्तहानीबरोबरच मोठी जीवित हानी झाली होती. अशा घटनांचा पूर्वानुभव असतानाही संबंधित प्रशासनाकडून सजगता दाखवली जात नसल्याचे कर्जतमध्ये दिसून येत आहे.
कर्जत परिसरातील टेकडीचे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत आहे. टेकडीची धूप होत असल्याने याठिकाणी पावसाळ्यात भूस्खलनाचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गावकऱ्यांवर सतत टांगती तलवार आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या या टेकडीवर ब्रिटिशकालीन वास्तूत तहसील कार्यालय, रजिस्टर कार्यालय आहेत, तर जवळच कारागृह आहे. याचठिकाणी रायगड जिल्हा परिषदेचे विश्रामगृह असून टेकडीच्या माथ्यावर वेदमाता मंदिर आहे. त्यामुळे भक्तगणांचाही येथे वावर आहे. निसर्गरम्य वातावरण असल्याने सकाळी जॉगिंग व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी अनेकजण याठिकाणी येतात. शहराला पाणीपुरवठा करणारी टाकीही याच टेकडीवर आहे.
टेकडीलगत सतत उत्खनन सुरू असते याशिवाय वृक्षतोडही होत असल्याने जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. परिणामी टेकडीवरील डांबरी रस्त्याला मधोमध तडे गेले असून वळणावर रस्ताही खचला आहे. टेकडीवरील दरड कोसळून भलेमोठे दगडही रस्त्यावर येऊन पडले आहेत. या रस्त्यावरून शासकीय कामकाजासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता खचल्यास मोठा धोका उद्भवू शकतो.
टेकडीच्या पायथ्याशी मुद्रे गाव वसले आहे. गावातील काही घरे उतारावर आहेत. ही घरे उभारताना पूर्वी मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले आहे. यापूर्वी या उतारावर मोठ्या प्रमाणात बांबूची बेटे असल्याने जमिनीची धूप रोखण्यास मदत व्हायची. परंतु गेल्या काही वर्षांत बांबूची बेटे जवळजवळ नष्ट झाली आहे. त्यामुळे टेकडीच्या उतारावरील मातीची धूप सुरू झाली असून अतिवृष्टी झाल्यास भूस्खलन होऊन टेकडीचा काही भाग पायथ्याशी असणाऱ्या घरांवर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीमुळेही टेकडीवर प्रचंड दाब पडत आहे. तरी संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
कर्जत शहरामध्ये पर्यटनस्थळ नसल्याने नागरिकांसाठी टेकडी हेच एक पर्यटनस्थळ आहे. टेकडीवरून दूरवर दिसणारे निसर्गाचे विहंगम दृश्य, दूरवर पसरलेली कृषी संशोधन केंद्राची भातशेती, टेकड्यांमधून आडमोळी वाट काढत जाणारा कर्जत-पनवेल रेल्वेमार्ग, दूरपर्यंत वसलेले कर्जत शहर आणि परिसराचे दर्शन या टेकडीवरून होते. सोसाट्याचा वारा, वनराई यामुळे या टेकडीवर सायंकाळी फेरफटका मारण्यास अनेकजण येतात. पहाटेच्यावेळी जॉगिंगसाठीही या टेकडीला प्राधान्य दिले जाते. या सर्व बाबींचा विचार करून या टेकडीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल, अशी कर्जतकरांची अपेक्षा आहे.