नवी मुंबई : भाडेकरू ठेवताना घरमालकांसह संबंधित इस्टेट एजंटने त्यांची माहिती स्थानिक पोलिसांना कळविणे आवश्यक आहे. मात्र, तळोजा येथे दोन प्रकरणांत भाडेकरू म्हणून ठेवलेल्या विदेशी नागरिकांची माहिती संबंधित घरमालकांनी पोलिसांना दिलेली नव्हती. तपासात हा निष्काळपणा उघड होताच तळोजा पोलिसांनी दोन घरमालकांसह एका इस्टेट एजंटविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईत भाड्याच्या घरात राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेकदा भाडेकरूंकडून गुन्हेगारी कृत्ये घडतात. अशावेळी ते गुन्हा करून पळून जातात. यामुळे त्यांची नेमकी माहिती मिळत नसल्याने त्यांचा शोध घेणे कठीण जाते. असे होऊ नये म्हणून आपल्या भाडेकरूची माहिती संबंधित घरमालकांनी स्थानिक पोलिसांना द्यावी, असे निर्देश यापूर्वी दिले होते.
तळोजा फेज २ सेक्टर १७ मधील साई आनंद सोसायटीतील फ्लॅट नं. १०१ मध्ये युगांडाचा रहिवासी ॲनेट ॲपीओ हा राहात होता. त्याच्यासोबत घरमालक मोहम्मद शमशोद्दीन यांनी भाडेकरार केला आहे. मात्र, त्याची नोंद तळोजा पोलिसात केलेली नव्हती. ही खोली भाड्याने देणारा एजंट युसुफ रोजन शेख यानेसुद्धा ही माहिती पोलिस ठाण्याला दिलेली नव्हती. दुसऱ्या एका प्रकरणात तळोजा फेज १ सेक्टर ५ मधील ‘सिल्वर होम्स’ या इमारतीतील घरमालक सलमान डाऊलकर (४०) यांनीही आयशा उमर या नायजेरियन महिलेला भाडेकरू म्हणून ठेवले होते. तिचीही माहिती त्यांनी पोलिसांना दिली नव्हती. यामुळे दोन्ही प्रकरणांत घरमालकांसह एजंटवर सरकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.