- वैभव गायकरपनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अलीकडच्या काळात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: भरधाव वेगात लेनची शिस्त न पाळल्यामुळे हे अपघात होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याची गंभीर दखल घेत महामार्ग पोलिसांनी लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या अंतर्गत मागील तीन महिन्यांत तब्बल १२,३७७ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २० लाख ७९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.जुलै १५ ते १८ सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहिमेत हा विक्र मी दंड महामार्ग पोलिसांनी वसूल केला आहे. द्रुतगती महामार्गावर वाहने थांबविण्यास मनाई असतानाही अतिउत्साही वाहनचालक रस्त्याच्या कडेला वाहन उभी करून फोटो, सेल्फी काढण्यास मग्न असतात. त्यामुळे अनेकदा गरज नसतानाही लेन कटिंगचे प्रकार घडतात. यात अवजड वाहनांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे दिसून आले आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकविण्यासाठी महामार्ग पोलिसांनी द्रुतगती महामार्गावर कळंबोली ते खालापूर टोलनाका दरम्यान कारवाई मोहीम राबविली होती, अशी माहिती पळस्पे येथील महामार्ग पोलीस केंद्राचे अधिकारी सुभाष पुजारी यांनी दिली. अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगावकर व मुख्यालयातील पोलीस अधीक्षक विजय पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.>वाहनचालकांना लेनची शिस्त लागावी म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी लेनची शिस्त पाळावी याकरिता अनेक वेळा जनजागृतीही करण्यात आली आहे. द्रुतगती महामार्गावर प्रवास करताना कृपया लेनची शिस्त पाळा, लेन कटिंगमुळेच या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात.- सुभाष पुजारी,अधिकारी, द्रुतगती महामार्ग पोलीस,पळस्पे केंद्र>कारवाईचा तपशीलमहिना कारवाई दंडजुलै ४९८७ ९,९७,४००आॅगस्ट ४८६९ ७,७५,८००सप्टेंबर २५२१ ३,०६,२००एकूण १२,३७७ २०,७९,४००
महामार्गावर लेनची शिस्त मोडणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:55 PM