लॅपटॉप चोरांचा धुमाकूळ; पोलिसांसमोरही आव्हान, कारच्या काचा फोडून करताहेत चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:42 AM2019-05-12T00:42:12+5:302019-05-12T00:42:38+5:30
कारची काच फोडून लॅपटॉप व इतर किमती वस्तू चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. वाहनतळ व हॉटेलसमोर उभ्या केलेल्या कारमधून साहित्य चोरीच्या घटना वाढत असून या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
नवी मुंबई : कारची काच फोडून लॅपटॉप व इतर किमती वस्तू चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. वाहनतळ व हॉटेलसमोर उभ्या केलेल्या कारमधून साहित्य चोरीच्या घटना वाढत असून या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
घणसोलीमध्ये राहणारे लक्ष्मण राजपुरोहित ६ मे रोजी रात्री कोपरखैरणेमधील वरिष्ठ हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून आतमधील लॅपटॉप व इतर साहित्य चोरून नेले. नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये अशाप्रकारच्या घटना नियमित घडू लागल्या आहेत. अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. वाहनाची काच फोडून एक मिनिटापेक्षा कमी वेळेत चोरटे घटनास्थळावरून गायब होत आहेत. त्यांच्याकडील साहित्याने प्रथम कारच्या चारही बाजूला ओरखडा तयार करतात. यानंतर कारच्या मध्यभागी जड वस्तूने किंवा हाताने जोरात धक्का दिला तरी काच लगेच तुटते. हे करण्यास अर्धा मिनिटपेक्षा कमी वेळ लागतो.
कारचालकांनी सावध राहावे
हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जाताना किंवा इतर ठिकाणी जाताना कारमध्ये लॅपटॉप व इतर वस्तू ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कारमध्ये ठेवलेले साहित्य चोरीला जाण्याची व काचेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.
पाच वर्षांत ५४५ लॅपटॉप चोरी
लॅपटॉप चोरीच्या घटना गत काही वर्षांमध्ये वाढल्या आहेत. पाच वर्षांमध्ये तब्बल ५४५ लॅपटॉप चोरीला गेले आहेत.
यामधील कारच्या काचा फोडून चोरी केल्याच्या घटनांची संख्याही मोठी आहे.
चोरीच्या या गुन्ह्यांचा उलगडा होण्याचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. २०१७ मध्ये १० व २०१८ मध्ये फक्त ४ गुन्ह्यांचाच उलगडा झाला आहे.