ऐरोलीतील ‘त्या’ इमारतीवर अखेर कारवाई
By admin | Published: June 14, 2017 03:28 AM2017-06-14T03:28:16+5:302017-06-14T03:28:16+5:30
ऐरोली सेक्टर २0 येथे बनावट बांधकाम परवानगीच्या (सीसी) आधारे उभारण्यात आलेल्या इमारतीवर अखेर मंगळवारी कारवाई करण्यात आली. सिडको व महापालिकेची
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर २0 येथे बनावट बांधकाम परवानगीच्या (सीसी) आधारे उभारण्यात आलेल्या इमारतीवर अखेर मंगळवारी कारवाई करण्यात आली. सिडको व महापालिकेची फसवणूक करणाऱ्या संबंधित विकासकावर एमआरटीपी अॅक्टनुसार कारवाई करणार असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ऐरोली सेक्टर २0 बी येथील ५२ क्रमांकाच्या भूखंडावर सात मजली बेकायदा इमारत उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही इमारत उभारताना संबंधित ओम साई डेव्हलपर्स या विकासकाने बनावट बांधकाम परवानगीचा आधार घेतल्याचे उघड झाले आहे. या सात मजली इमारतीत एकूण ४९ फ्लॅट असून त्यापैकी ३0 फ्लॅटची यापूर्वीच विक्री करण्यात आली आहे, तर उर्वरित फ्लॅट भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. या इमारतीची बांधकाम परवानगी बोगस असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सिडकोच्या वतीने संबंधित विकासकाला वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच इमारतीतील घरे न विकण्याच्या सूचना करण्यात आल्या. परंतु त्यानंतरही विकासकाने घरे विकून अनेक कुटुंबांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना २0१५ मध्ये सिडकोने संबंधित विकासकाला नोटीस बजावून बांधकाम थांबविण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु या विकासकाने या नोटीसला न्यायालयातून स्थगिती आणून बांधकाम सुरूच ठेवले होते. सध्या इमारतीच्या तीन ते सातव्या मजल्यापर्यंतचे बांधकाम प्रगतिपथावर होते. बांधकामाला न्यायालयाची स्थगिती असतानाही बांधकाम सुरू ठेवून विकासकाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सिडकोने नोटीस बजावली होती. या नोटिसीच्या अनुषंगाने मंगळवारी धडक कारवाई करण्यात आली. याअंतर्गत इमारतीच्या वरचे चार मजले ब्रेकरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. दरम्यान, ग्राहकांनी घरे घेताना कागदपत्रांची तपासणी करून घ्यावेत, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.
सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे नियंत्रक पी.बी. राजपूत, सहाय्यक नियंत्रक गणेश झिने, महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी नीलेश मोरे, सहाय्यक अभियंता एम.सी. माने आदी उपस्थित होते. या कारवाईसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.