सिडकोमध्ये घरांच्या अर्जदारांना अखेरची संधी""
By admin | Published: May 1, 2017 06:45 AM2017-05-01T06:45:28+5:302017-05-01T06:45:28+5:30
विविध गृहप्रकल्पातील घरांसाठी सिडकोने सोडत काढली होती. या सोडतीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांनी निर्धारित
नवी मुंबई : विविध गृहप्रकल्पातील घरांसाठी सिडकोने सोडत काढली होती. या सोडतीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांनी निर्धारित वेळेत पैशांचा भरणा न केल्याने त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत ३0 एप्रिल रोजी संपत असल्याने अर्जदारांच्या सोयीसाठी ही मुदत मंगळवार २ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतीनंतर संबंधित अर्जदारांना कोणतीही संधी मिळणार नसल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सिडकोने विविध उत्पन्न गटातील घटकांसाठी स्वप्नपूर्ती, वास्तुविहार/सेलिब्रेशन, व्हॅलिशिल्प, सीवूड्स इस्टेट आणि उन्नती हे गृहप्रकल्प उभारले आहेत. संगणकीय सोडतीद्वारे यातील घरांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार पात्र ठरलेल्या अर्जदारांना वाटपपत्र देण्यात आले. वाटपपत्र प्राप्त झालेल्या अर्जदारांनी तीन महिन्यांच्या आत सदनिकेच्या किमतीची रक्कम भरणे आवश्यक होते. त्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती ग्राहकांनी केली होती. त्यानुसार सिडकोने संचालक मंडळाच्या बैठकीत विशेष ठराव पारित करून विलंब शुल्कासह पैसे भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली होती. ३0 एप्रिल रोजी ही मुदत संपत आहे; परंतु शेवटच्या दोन दिवसांत शनिवार आणि रविवार येत असल्याने ग्राहकांच्या सोयीसाठी ही मुदत २ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. या वाढीव मुदतीच्या आत जे सदनिकाधारक विलंब शुल्कासह पैशांचा भरणा करणार नाहीत, त्यांचे वाटपपत्र रद्द केले जाणार आहे, तसेच नियमानुसार नोंदणी शुल्काची संपूर्ण रक्कम व भरलेल्या हप्त्यांच्या दहा टक्के रक्कम जप्त करून संबंधित प्रकरण निकाली काढले जाईल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)